ST Bus: 78 वर्षांची प्रतीक्षा संपली! 'या' गावात पहिल्यांदाच धावली लालपरी; गावकऱ्यांनी केला ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष

Ratnagiri ST bus service after 78 years : रत्नागिरी जिल्ह्यातील एका गावाची 78 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. गावात पहिल्यांदाच एसटीची लालपरी दाखल झाली असून ग्रामस्थांनी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले
Ratnagiri ST Bus
Ratnagiri ST BusSarkarnama
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : कोकणातील एका गावासाठी स्वातंत्र्यानंतरची तब्बल 78 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात असलेल्या माचाळ गावात पहिल्यांदाच एसटी बस अर्थात लालपरी दाखल झाली आहे. गावात बस पोहोचताच ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि ढोल-ताशांच्या गजरात तिचे जंगी स्वागत केले. अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माचाळ हे गाव निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असून त्याला 'मिनी महाबळेश्वर' म्हणूनही ओळखले जाते. मात्र, पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या या गावात सार्वजनिक वाहतुकीची सुविधा नव्हती. त्यामुळे गावकऱ्यांना अनेक वर्षे दळणवळणाच्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्ता तयार झाल्यानंतर ग्रामस्थांनी गावात एसटी बस सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. अखेर या मागणीची दखल घेण्यात आली आणि एसटी महामंडळाच्या माध्यमातून गावात बससेवा सुरू झाली.

Ratnagiri ST Bus
IAS IPS Couple Controversy : राष्ट्रपती पदक विजेत्या IPS चा धक्कादायक कारनामा; अडीच वर्षांत तब्बल 40 व्हिला अन् कॉटेजची खरेदी!

बससेवा सुरू होण्यापूर्वी माचाळमधील नागरिकांना बाजारपेठ, शाळा किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी लांजा अथवा साखरपा येथे जाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती.

अनेकदा सकाळी 8 वाजता घरातून निघाल्यानंतर संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत प्रवासातच वेळ जायचा. त्यामुळे साध्या कामासाठीही ग्रामस्थांना पूर्ण दिवस खर्च करावा लागत होता. गावातील जुन्या पिढीने आयुष्यभर ही वाहतुकीची अडचण अनुभवली. मात्र, आता एसटी बस गावात पोहोचल्याने पुढच्या पिढीचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

Ratnagiri ST Bus
Birthday gift helipad : भाजपच्या माजी खासदाराला वाढदिवसानिमित्त लेकीकडून चक्क हेलिपॅड गिफ्ट

माचाळ गावात लालपरीचे आगमन हा केवळ बससेवेचा प्रारंभ नसून ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या संघर्षाला मिळालेले यश आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे शिक्षण, आरोग्य, बाजारपेठ आणि दैनंदिन प्रवासासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. 78 वर्षांनंतर गावात धावलेल्या लालपरीचे स्वागत करताना ग्रामस्थांचा उत्साह पाहण्यासारखा होता.