

राजस्थानमधील वरिष्ठ महिला IPS अधिकारी डॉ. प्रशाखा माथुर सध्या एका कथित भ्रष्टाचार प्रकरणामुळे चर्चेत आल्या आहेत. राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित झालेल्या प्रशाखा माथुर आणि त्यांचे पती वरिष्ठ IAS अधिकारी शिखर अग्रवाल यांच्यावर 40 आलिशान व्हिला आणि कॉटेज खरेदी प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 'अनंता रिसॉर्ट्स' या कंपनीकडून बाजारभावापेक्षा कमी किमतीत मालमत्ता खरेदी केल्याचा तसेच कंपनीला नियमांमध्ये सवलती देऊन अनुचित फायदा मिळवून दिल्याचा आरोप या दाम्पत्यावर आहे.
प्रशाखा माथुर, त्यांचे पती शिखर अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अवघ्या अडीच वर्षांच्या कालावधीत एकाच कंपनीकडून 40 व्हिला आणि कॉटेज खरेदी केल्याचा आरोप आहे. या व्यवहारांमध्ये मालमत्ता कमी किमतीत खरेदी करण्यात आल्याचा आणि संबंधित कंपनीला प्रशासकीय नियमांमध्ये सवलती मिळवून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाची दखल घेत राजस्थान सरकारने सर्वप्रथम IAS अधिकारी शिखर अग्रवाल यांना APO (Awaiting Posting Orders) केले. त्यानंतर त्यांची पत्नी आणि वरिष्ठ IPS अधिकारी प्रशाखा माथुर यांचाही APO यादीत समावेश करण्यात आला.
या कथित व्हिला खरेदी प्रकरणाची व्याप्ती वाढत असून, राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) तपास सुरू आहे. शिखर अग्रवाल यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी सरकारने ACB ला मंजुरी दिल्याची माहिती आहे. उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता, आर्थिक व्यवहारांमधील अनियमितता आणि संबंधित कंपनीला मिळालेल्या कथित लाभांची तपासणी होण्याची शक्यता आहे. या तपासादरम्यान प्रशाखा माथुर यांचीही चौकशी होऊ शकते.
प्रशाखा माथुर यांनी राजस्थानमधील विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी म्हणून काम केले आहे. अलवर येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर सिरोही, जोधपूर ग्रामीण, बांसवाडा आणि पाली यांसारख्या ठिकाणी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.
2009 मध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवर त्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये (IB) गेल्या. येथे त्यांनी अतिरिक्त उपसंचालक आणि उपसंचालक म्हणून काम पाहिले. 2014 मध्ये राजस्थानमध्ये परतल्यानंतर पोलीस मुख्यालयासह विविध वरिष्ठ पदांवर त्यांनी जबाबदारी सांभाळली.
प्रशाखा माथुर यांना 2011 मध्ये पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर 2022 मध्ये उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले.
मात्र, आता 40 व्हिला खरेदी प्रकरणामुळे त्यांची कारकीर्द चर्चेत आली आहे. या प्रकरणातील आरोप सिद्ध झालेले नसून, ACB तपासातून आर्थिक व्यवहारांचे नेमके स्वरूप आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका स्पष्ट होणे अपेक्षित आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.