
Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी नगरपंचायत निवडणुकांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना सज्ज झाली आहे. दरम्यान महायुतीने जिल्ह्यात मोर्चे बांधणीला सुरूवात केली असून भाजपही तयारी करताना दिसत आहे. अशातच आता मंत्री उदय सामंत यांनी महायुती सोबत लढूच पण गरज पडल्यास स्वबळाची तयारी असल्याचे सांगितले आहे. ते येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. सामंत यांच्या वक्तव्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता असून येथे भाजप-शिवसेना आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसेनेकडून रणनीती आखण्यात आली असून याची कार्यकर्त्यांना माहिती देताना ते बोलत होते. यावेळी आमदार निलेश राणे, दीपक केसरकरही उपस्थित होते. यावेळी सामंत यांनी, आपली महायुती सोबत लढण्याची तयारी आहे. पण निलेश राणे आणि आपण दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा चर्चेला बसू चर्चा करू. जर आपलं ठरलं तर नगरपंचायतीसाठी महायुतीबरोबर जाऊ. पण तुम्ही ठरवलं स्वबळावर लढायचं तर स्वबळावर देखील लढू, असा इशारा सामंत यांनी दिला आहे.
नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती जिंकायच्या असतील तर आपण त्याची वेगळी स्ट्रॅटेजी तयार करू. पुढील चार महिन्यांमध्ये शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक नंबरला येईल असं काम करू. संजू परब यांनीही सांगितलं आहे की, अनेक लोक थांबले आहेत. पण आम्हाला माहिती आहे की कोण निलेशजींच्या संपर्कात आहेत त्यांनी कोणत्या मोठ्या माशांना हात घातला आहे ते देखील मला माहिती आहे अशा शब्दात निलेश राणे यांच्या कामाच कौतुक करत सामंत यांनी विरोधकांनाही सूचक इशारा दिला आहे.
आमच्या भरतशेठ गोगावले यांच्या नॅपकिनवरून काही लोकांनी चर्चा केली होती. पण तो नॅपकिन जो आहे तो निष्ठेचा आहे. तो जनसमान्यांनी ताकद दिलेला नॅपकिन आहे. त्या नॅपकिनला जनतेनं दिलेल्या आशीर्वादावरच भरतशेठ चार चार वेळा निवडून आले आहेत, अशा शब्दात गोगावले यांचे कौतुक उदय सामंत यांनी केलं आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. तसेच भरतशेठ तुमच्या मनातील इच्छा लवकर पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सामंत यांनी आगामी नगरपंचायत निवडणुकांसाठी असो किंवा सुनील तटकरे यांचे नाव न घेता लगावलेला टोला असो. आता येथील वातावरण चांगलेच तापणार आहे. तसेच सामंतांच्या वेगळ्या भूमिकेमुळे नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीमधील घटक पक्ष देखील स्वबळाची चाचपणी करू शकतात असेच स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.