कदम पिता-पुत्रांची बंडखोरी राष्ट्रवादीच्या पथ्यावर? संजय कदमांची पुन्हा आमदारकीसाठी तयारी

Yogesh Kadam | Shivsene | NCP : मुंबईतील बैठकीनंतर राष्ट्रवादीने टाकला मोठा डाव
Ramdas Kadam & Yogesh Kadam
Ramdas Kadam & Yogesh KadamSarkarnama
Published on
Updated on

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐतिहासिक बंडात शिवसेनेतील तब्बल ४० आमदार सहभागी झाले. यामुळे राज्यात ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार जावून सत्तांतर झाले. याच बंडात दापोलीचे आमदार आणि माजी शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे पुत्र योगेश कदम (Yogesh Kadam) हे देखील सहभागी झाले आहेत. त्याचा मोठा फटका शिवसेनेला दापोली मतदारसंघात बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र शिवसेनेत पडलेल्या याच फुटीमध्ये संधी साधत दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा डाव टाकला आहे. मुंबईमध्ये दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची नुकतीच एक बैठक पार पडली. ही बैठक पार पडताच दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचीही बैठक झाली आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार आणि माजी आमदार संजय कदम यांचा पराभव झाला. त्या नंतरही दापोली विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादीची ताकद त्याच प्रमाणात शिल्लक असल्याचे वारंवार पाहायला मिळाले. विकासकामांमध्ये संजय कदम हे कोठेही मागे राहिले नाहीत. त्याचप्रमाणे मतदारसंघातील प्रत्येक गावात संजय कदम यांचा पूर्वीप्रमाणेच संपर्क पाहायला मिळत आहे.

तत्कालिन अर्थमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री अनिल परब यांच्यासह रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून संजय कदम यांनी कोट्यवधीची विकासकामे दापोली मतदार संघामध्ये आणली. मात्र शिवसेनेमध्ये नुकत्याच झालेल्या राजकीय उठावानंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाले. आमदार योगेश कदम हे एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते.

राष्ट्रवादीच्या बैठकीत संजय कदम, भाई पोस्टुरे, प्रकाश शिगवण यांच्यासह दापोली विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यात दापोली विधासभा मतदार संघात घरोघरी राष्ट्रवादी पक्ष पोहोचवण्यासाठी प्रयत्न करून पुन्हा या मतदार संघात पक्षाचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.

तर शिवसेनेच्या झालेल्या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते व माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरवण्यात आले व पुढील विधानसभा निवडणुकीत पक्षप्रमुख जो उमेदवार देतील, त्याचे काम करून दापोली मतदारसंघावर शिवसेनेचाच भगवा कायम राहील, यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे ठरवण्यात आले. एकाच मतदारसंघातील दोन प्रमुख पक्षांच्या झालेल्या बैठकीमुळे आगामी काळात दापोली विधानसभा मतदार संघातील वातावरण ढवळून निघणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com