

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार व त्यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
मात्र सुनील तटकरे यांनी व्हायरल व्हिडिओ व विलिनीकरणाच्या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत.
Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत अकाली निधन झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार यासह खासदार सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशा चर्चांना उत आला आहे. त्यापद्धतीने राजकीय घडामोडींना वेग आला असून सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्याचेही बोलले जात आहे. पण अजितदादांचा शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या काही प्रमुळ नेत्यांच्या बैठकीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत होती अशी चर्चा सुरू आहे. याच व्हिडिओवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ज्यात त्यांनी सर्व चर्चा फेटाळल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत व्हायरल होणारा व्हिडिओ देखील सत्य नसल्याचे म्हटले आहे.
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर राज्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्या आणि पक्ष पुन्हा एकत्र यावा अशी शेवटची इच्छा दादांची होती असा गौप्यस्फोट जयंत पाटील यांनी केला होता. तसेच असेच काहीसा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील केला होता. शिंदे यांच्या दाव्याप्रमाणे दादांची जी खरी अंतिम इच्छा होती ती पूर्ण करण्यासंदर्भात आमचा पक्ष निश्चितपणे बांधील असेल.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतची चर्चा 100 टक्के झाली होती. जयंत पाटील, सुप्रिया ताई, मी आणि हर्षवर्धन पाटील अशा अनेक नेत्यांसोबत ही चर्चा झाली होती. नगरपंचायत आणि महानगरपालिकानंतर या चर्चेने वेग घेतला होता. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी निर्णय घेऊ असे दादांनी म्हटलं होतं. याबाबत 12 तारखेच्या बैठकीत असा निर्णय झाला होता असेही शिंदेंनी म्हटलं होते.
जयंत पाटील यांनी देखील शरद पवार यांच्या हयातीत राष्ट्रवादी पक्ष एकत्र करायचा अशी अजित दादांची मनोमन इच्छा होती, मागच्या सहा महिन्यात झालेल्या बैठकीत अजित दादांनी ही गोष्ट बोलून दाखवली होती. शरद पवारांनी याबाबतची जबाबदारी माझ्याकडे दिली होती, असे स्पष्टीकरण दिले होते. तर शेवटची 16 तारखेला माझ्या घरी आमच्या पक्षातील मुख्य नेत्यांची आणि अजित पवारांची बैठक झाली होती. त्याआधी अमोल कोल्हे हर्षवर्धन पाटील यांना घेऊन एकदा आणि आमचे पक्षांचे अध्यक्ष यांना घेऊन दोन वेळा बैठक झाल्याचेही त्यांनी सांगितले होते.
दरम्यान शरद पवार आणि अजित पवार यांच्यात एक अत्यंत महत्त्वाची बैठक 17 जानेवारी 2026 रोजी पार पडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामुळे मराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत जयंत पाटील, रोहित पवार, शशिकांत शिंदे, राजेश टोपे आदी नेते उपस्थित असल्याचे दिसत आहेत. पण आता ही बैठक नेमकी कशासाठी होती याचे स्पष्टीकरण सुनील तटकरेंनी दिले आहे.
सुनील तटकरे यांनी, आताच एक आमची बैठक पार पडली. आता २ वाजता विधीमंडळ राष्ट्रवादी पक्षाची बैठक होईल. जेनतेच्या भावना लक्षात घेता आम्ही हा निर्णय घेतला असून आज आमच्या पक्षाचा नेता निवडला जाईल. त्याचबरोबर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले की, “आज व्हायरल असलेल्या व्हिडीओमध्ये जी बैठक दाखविण्यात आली.
ती बारामतीमधील कृषी प्रदर्शनापूर्वी झालेली बैठक होती. त्यावेळी खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्थानिक स्वराज संस्थांच्या बाबतीत त्या बैठकीत चर्चा झाल्याचे ते म्हणाले होते”, असं सुनील तटकरे म्हणाले आहेत. त्यामुळे तो व्हिडिओ राष्ट्रवादी विलिनीकरणासाठी आयोजित चर्चेच्या बैठकीचा नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे. तटकरे यांच्या या खुलासानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना ब्रेक लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
Q1. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार आहे का?
👉 नाही, सुनील तटकरे यांनी या सर्व चर्चा स्पष्टपणे फेटाळल्या आहेत.
Q2. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत का?
👉 सध्या याबाबत अधिकृत घोषणा नाही, फक्त राजकीय चर्चा सुरू आहेत.
Q3. व्हायरल व्हिडिओमध्ये काय दावा केला जात आहे?
👉 अजित पवार, शरद पवार आणि इतर नेत्यांची बैठक विलिनीकरणासाठी होती असा दावा केला जात आहे.
Q4. सुनील तटकरे यांनी व्हिडिओबाबत काय सांगितले?
👉 व्हिडिओ चुकीचा व दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
Q5. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत काय स्थिती आहे?
👉 पक्षात भावनिक वातावरण असून राजकीय अफवा पसरल्या आहेत, मात्र अधिकृत निर्णय नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.