

Raigad News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूवरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांना आता तटकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रामदास कदम यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार असून त्यांचा आपण तीव्र निषेध करतो, असे तटकरे (Sunil Tatkare) यांनी स्पष्ट केले.
एवढेच नव्हे, तर रामदास कदम यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. तर 'रामदास कदम (Ramdas Kadam) यांची मानसिक स्थिती ठीक नाही. त्यांच्यावर ठाण्याऐवजी आग्र्याला उपचार करावेत,' असा खोचक टोलाही तटकरे यांनी लगावला. त्यामुळे कोकणातील दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष आता आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.
रामदास कदम यांनी नुकतेच दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा संदर्भ देत सुनील तटकरे यांच्या चौकशीची मागणी केली होती. तसेच, तटकरे यांचा संबंध माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांच्या राजकीय कारकिर्दीशी जोडत गंभीर आरोप केले होते. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अखेर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत कदमांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
'रामदास कदमांची मानसिक स्थिती ठीक नाही'
पत्रकार परिषदेत बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, रामदास कदम यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो. रामदास कदम यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे दिसते. त्यांच्यावर ठाण्याऐवजी आग्र्याला उपचार करण्याची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, आपण बॅरिस्टर अंतुले यांचे पीए नव्हतो, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. अंतुले यांच्याबाबत धर्मांध पद्धतीने आरोप करण्याचा रामदास कदम यांना कोणताही अधिकार नाही, असे म्हणत त्यांनी कदमांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. या प्रकरणी रामदास कदम यांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.
'अनिल परबांच्या आरोपांना उत्तर द्या'
रामदास कदम यांनी माझ्यावर आरोप करण्यापेक्षा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर द्यावे, असे आव्हानही तटकरे यांनी दिले. स्वतःची राजकीय प्रतिमा काय आहे, हे आधी त्यांनी स्पष्ट करावे. माझ्यावर आरोप करून स्वतःची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दांत त्यांनी कदमांना लक्ष्य केले.
'रामदास कदम माझ्या हातापाया पडले होते'
यावेळी सुनील तटकरे यांनी रामदास कदम यांच्यासोबतच्या जुन्या राजकीय संबंधांचाही उल्लेख केला. नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, त्यावेळी रामदास कदम माझ्याकडे आले होते. त्यांनी माझी विनवणी केली होती. त्यावेळी मी त्यांना माझ्या गाडीतून अजित पवार यांच्याकडे घेऊन गेलो होतो. त्यानंतर कदम विरोधी पक्षनेते झाले, असा दावा तटकरे यांनी केला. मी सांगत असलेली गोष्ट खरी की खोटी, हे रामदास कदम यांनी ज्या जागृत देवस्थानावर त्यांची श्रद्धा आहे, तिथे येऊन सांगावे, असे आव्हानही तटकरे यांनी दिले. कदम यांनी केलेले आरोप हे त्यांच्या ढासळलेल्या प्रकृतीचे द्योतक असल्याची टीकाही त्यांनी केली.
काय म्हणाले होते रामदास कदम?
दरम्यान, ऐन दिवाळीत रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर आरोपांचा बॉम्ब फोडला होता. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमागे घातपात होता का आणि त्यामध्ये सुनील तटकरे यांचा काही संबंध आहे का, या दिशेने तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. तटकरे यांच्या महत्त्वाकांक्षा राक्षसी असून त्या पूर्ण करण्यासाठी ते काहीही करू शकतात, असा दावाही कदम यांनी केला होता. तटकरे यांना उपमुख्यमंत्री व्हायचे होते, असे आपल्या कानावर आल्याचेही त्यांनी म्हटले होते.
'तटकरे हे अंतुले साहेबांचे पीए होते. अंतुले साहेबांना यानेच संपवलं. जो जो माणूस तटकरे यांना जवळ करतो, त्यालाच संपवण्याचं काम ते करतात. त्यांना स्वतःला उपमुख्यमंत्री व्हायचं होतं, असं मी ऐकतोय. मग अजितदादांच्या घातपातामागे यांचाही हात होता का? या दिशेने तपास करावा,' असे खळबळजनक वक्तव्य रामदास कदम यांनी केले होते.
राष्ट्रवादीकडूनही कदमांवर टीका
रामदास कदम यांच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली होती. रामदास कदम यांनी यापूर्वीही सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले आहेत. तटकरे गेल्या ४० वर्षांपासून कोकणात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रुजवण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे हा वाद स्थानिक पातळीवरील राजकीय संघर्ष म्हणून पाहिला पाहिजे, असे उमेश पाटील यांनी म्हटले होते.
एकीकडे रामदास कदम यांचे गंभीर आरोप, तर दुसरीकडे सुनील तटकरे यांचा आक्रमक पलटवार आणि कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा, यामुळे कोकणातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. आता कदम या इशाऱ्याला काय उत्तर देतात आणि हा वाद कायदेशीर पातळीवर पोहोचतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.