
Kokan Politics News : गेल्या 20 वर्षापासून राजकीय चुली वेगळ्या असणाऱ्या ठाकरे बंधुंमध्ये दोन दिवसापूर्वी घरोबा झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मराठीच्या मुद्यावर एकत्र आले. यानंतर आता राज्यातील राजकीय समिकरणं बदलतील? स्थानिकला उद्धव-राज यांचा ठाकरे ब्रँड चालेल अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. पण असे झाल्यास तळकोकणात नारायण राणेंसह उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या साम्राज्याला हादरे बसणार का? तशी ताकद आता ठाकरे बंधू निर्माण करणार का हे पहावं लागणार आहे.
मराठी अस्मितेच्या मुद्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता एकत्र आले आहेत. ते आता आगामी स्थानिकसह विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीलाही राहणार असे आता सांगितले जात आहे. तर याचा फटका महाविकास आघाडीसह महायुतीला बसण्याची शक्यता वर्तवली जातेय.
पण ठाकरे बंधू एकत्र जरी आले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तशी काही ताकद वाढणार नाही. पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे येथे वाढलेली शिवसेना आता संपत आलेली आहे. तर स्वत: राज ठाकरे यांनी काढलेल्या पक्षाचा येथे संपर्क म्हणावा इतका नाही. पक्षाच्या उभारीच्या काळात येथे मनसेचे एखादा दुसरा नगरसेवक होता. पण आज परिस्थिती वेगळी आहे. पक्ष स्थापनेनंतर सिंधुदुर्गात मनसेला चांगले पाठबळ मिळाले होते. मात्र, संघटना बांधणी न झाल्याने या पक्षाचा जनाधार जवळपास संपला.
पूर्वी म्हणजे 1990 च्या सुमारात हा तळकोकण म्हणजे ठाकरेंचा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. पण नारायण राणे फुटले आणि येथीळ शिवसेनेला गळती लागली. शिवसेनेची ताकद कमी झाली. त्यानंतर कुडाळ आणि सावंतवाडी मतदारसंघांत शिवसेनेनं उभारी घेतली होती. पण पक्ष बांधणी, पदाधिकाऱ्यांना वेळ न देण यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना येथे पार ढेपाळली आहे. काही ठरविक कार्यकर्ते, पदाधिकारी वगळता उर्वरित कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालातून ठाकरेंच्या शिवसेनेनं जनाधार गमवल्याचे समोर आले आहे. तर मनसेला देखील लोकांनी नाकारल्याचे चित्र आहे. पण जिल्ह्यात बाळासाहेब यांच्यामुळे ठाकरेंना मानणारा मतदार आहे. तो विखूरलेला आहे. पण उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्याने तो आता अॅक्टीव्ह होवू शकतो. आताही येथे उद्धव ठाकरेंना मानणारा 50 हजार मतदार असल्याचे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत समोर आलं आहे. जो सिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघात आहे.
सद्यस्थितीत हिंदी भाषेच्या सक्तीचा विषय, दिल्ली लॉबीचे राज्यातील नेत्यांवर वाढते प्रभुत्व यामुळे भाजप आणि शिंदे शिवसेनेबाबत मतदारांची नाराजी आहे. अशीच नाराजी जिल्ह्यात देखील आहे. अशावेळी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने युतीलाही भवितव्य चांगले आहे. याचा फायदा भविष्यात माजी आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर यांच्यासह शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांना होऊ शकतो.
वीस वर्षानंतर आता उद्धव आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र आले आहेत. त्यांच्या एकत्र येण्याने मात्र जिल्ह्यातील राजकारणावर फारसा परिणाम होईल, असे दिसत नाही. कारण सध्या येथील राजकीय स्थिती पाहता मनसेची ताकद सीमित आहे. फक्त काही परिणाम झालाच तर तो खेड, दापोली तालुक्यात होऊ शकतो. तसेच जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व असले तरी पक्षफुटीमुळे आता ती कमी झाली आहे. सध्या जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना अत्यंत्य मजबूत स्थितीत आहे. येथे शिवसेनेचे दोन मंत्री आणि आमदार असल्यामुळे त्यांची ताकद जास्त आहे.
खेड, दापोली तालुक्यात कोकण संघटक वैभव खेडेकर यांच्यामुळे मनसेची चांगली ताकद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेवर मनसेचा झेंडा होता. तेथे ठाकरे शिवसेना आणि मनसे एकत्र आले तर काही प्रमाणात फरक पडू शकतो. रत्नागिरी, राजापूरमध्ये काही प्रमाणात मनसे आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी माणूस ताकदीने सक्रिय होत आहे. युती झाल्यास याचे परिणाम आगामी महापालिका, पालिका निवडणुकीत दिसतील असा दावा रत्नागिरी ठाकरे शिवसेना शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी केला आहे.
तर असाच दावा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद मालाडकर यांनी देखील केला असून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी माणसाला अनेक वर्षांपासून जे अपेक्षित होते ते झाले आहे. दोघे बंधू एकत्र आल्यामुळे आता एक आणि एक 2 नव्हे तर 11 होतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आता मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या दाव्या प्रमाणे खरेच एक आणि एक 2 नव्हे तर 11 होणार की शून्य अधिक शून्य बरोबरच शून्यच राहणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.