Shivsena UBT-MNS Alliance News : 'महाराष्ट्राच्या मनातलं ओळखणाऱ्यानी श्री भास्कर जाधव यांच्या मनातलं ओळखलं का ???', 'होय आम्ही नवीन आहोत पण कधी केम छो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत,जिलेबी अन् फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही .' ही वाक्य आहेत मनसेचे मुंबई शहाराध्यक्ष संदीप देशपांडे यांची. संदीप देशपांडे हे राज ठाकरेंच्या अंतर्गत वर्तुळातील विश्वासू नेते समजले जातात. त्यांची वरील वक्तव्य ही उद्धव ठाकरे हे मनसेसोबत युती करण्यासाठी सकारात्मक संदेश देत असताना केलेली आहेत. त्यामुळे राज-उद्धव हे ठाकरे बंधु एकत्र येणाच्या चर्चांमध्ये खरेच काही तथ्य आहे की केवळ दिखावा असा संशय निर्माण होतोय.
उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक असल्याचे सांगितले असले तरी त्यांनी अजुनही अधिकृत प्रस्ताव राज ठाकरे यांना पाठवलेला नाही. आणि राज ठाकरे यांनी एप्रिलमध्ये मनसे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युती हा संवेदनशील विषय असून त्यावर वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचे आदेशच मनसेच्या नेत्यांना दिले होते. मात्र, जून महिन्यात संदीप देशपांडे युतीच्या चर्चेबाबत संजय राऊतांवर टीका करताना अप्रत्यक्ष उद्धव ठाकरेंना टार्गेट करत आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनीच त्यांना बोलण्याची परवानगी दिली का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
मनसेचे नेते उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवायला तयार नाहीत.2012 मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सकारात्मकता दाखवली होती. मनसेकडून युतीची बोलणी करण्याची जबाबदारी बाळा नांदगावकर यांच्यावर होती. दोन्ही भाऊ एकत्र येणार शिवसेना-मनसे युती होणार असे चित्र असताना उद्धव ठाकरेंनी मनसेला चकवा दिला. मनसेला चर्चेमध्ये अडकवून भाजपसोबत युती केली. त्यामुळे आत्तादेखील उद्धव ठाकरे तसेच करतील असा संशय मनसे नेत्यांना आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिका निवडणूक ही अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या ठाकरेंना विधानसभेनंतर मुंबई महापालिके पराभूत करून त्यांच्या राजकारणच संकटात टाकण्याची भाजपसाठी सुवर्णसंधी आहे. ती संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोडण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळेच त्यांनी राज ठाकरेंची भेट घेत मुंबई महापालिकेत वेगळे राजकीय समीकरण अस्तित्वात येते का? याची चाचपणी केल्याची चर्चा आहे. मनसेने ठाकरेंसोबत न जाता शिंदेच्या शिवेसेनेसोबत जावे किंवा स्वतंत्र लढावे, यासाठी भाजपमधून प्रयत्न केले जात आहेत. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यापासून मनसे नेत्यांचे सूर देखील बदलेले आहेत. उद्धव ठाकरेंच्या विरोधातील सूर ते आळवू लागली आहेत. उद्धव यांच्यावर कसा विश्वासू ठेवू शकत नाही, हे सांगत आहेत.
उद्धव ठाकरे यांची विधानसभेत पिछेहाट झाली आहे. मात्र, मुंबईत त्यांचे दहा आमदार आहेत. शिवसेनेची खरी ताकद ही मुंबईतच आहे. त्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर मराठी मतदार आपल्यासोबत असल्याची संधी मुंबई महापालिकेमुळे उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे मनसेसोबत ते युती करण्यास इच्छुक असल्याचे ते सांगितले जात आहे. थेट मनसेच्या विरोधात भूमिका घेणे त्यांना परवडणारे नाही. कारण मनसेच्या विरोधात ते काही बोलले आणि युती करण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले तर त्यांची प्रतिमा नकारात्मक होण्याचा धोका आहे. त्याचा थेट फटका निवडणूक बसण्याचा शक्यता आहे. त्यामुळेच आपण युतीसाठी इच्छुक आहोत असे ते स्पष्ट सांगत आहेत. मात्र, मनसेला सोबत घेतल्याने मुस्लिम मते त्यांच्यापासून दूर जाण्याचा धोका आहे. तसेच परप्रांतीय मतदारांचा देखील फटका बसण्याचा धोका आहे. त्यामुळे पडद्यामागून ठोस काही बोलणी न करता केवळ माध्यमांमध्ये आपण युतीसाठी इच्छुक असल्याचे ते दाखवत असल्याचे काही राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालेल्या मतांचा विचार केला तर ठाकरे ब्रँड धोक्यात आल्याचे संकेत मिळाले. त्यामुळे कधी नव्हे ते ठाकरे बंधुंनी एकत्र यावे, असा विचार पुढे आला. त्याची सुरवात राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये केली. महाराष्ट्राच्या हितापेक्षा माझा इगो मोठा नसल्याने म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंकडे युतीसाठी हात पुढे केला.उद्धव ठाकरेंनीही जाहीर कार्यक्रमात महाराष्ट्राच्या मनात आहे ते होणार असे म्हणत मनसेसोबत युती करण्यासाठी ते सकारात्मक असल्याचे म्हटले. स्थानिक पातळीवर तर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन देखील झाले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि राज ठाकरे यांची एका हाॅटेलमध्ये भेट झाली आणि ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चांकडे संशयाने पाहायले जाऊ लागले.
एप्रिल महिन्यात दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी सर्वप्रथम उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या दृष्टिने महाराष्ट्राच्या हितापेक्षा माझा इगो मोठा नसल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर दोन महिन्यांमध्ये ते अनेकदा माध्यमांच्या समोर आले मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत युती करण्यावर स्पष्ट बोलण्याचे टाळले. त्यातच ते जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हाॅटेलमध्ये भेटले त्याच वेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे हे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांना भेटले. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात उद्धव यांच्यासोबत जाण्याबाबत अजूनही संभ्रम असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळेच उद्धव ठाकरेंसोबत युतीबाबत ते स्पष्ट काही बोलले नसल्याचे दिसते.
युती आणि आघाडीच्या चर्चा या लगेच सार्वजनिक केल्या जात नाही जोपर्यंत दोन्ही पक्षांमध्ये स्पष्ट बोलणी होत नाही. आधी पडद्यामागून चर्चा आणि समान कार्यक्रम ठरल्यानंतर युती आघाडीचे बोलणे सार्वजनिक केले जाते. मात्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून युती होणार असे सांगितले जाते मात्र मनसेसोबत तसे काही बोलणे झाल्याचे सांगितले जात नाही. त्यातच मनसेकडून देखील आम्हाला युतीचा कुठलाही प्रस्ताव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता असताना दोन्ही पक्षाकडून युतीबाबत अधिकृत अशी कुठलीच भूमिका घेतली गेलेली नाही. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधुंकडून युतीची चर्चा हा केवळ रणनीतीचा भाग असून केवळ दिखावा तर नाही ना? यासाठी संशयला जागा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.