

Raigad News : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साईडोंगर परिसरात टोरंट पॉवर प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या वृक्षतोडीवरून राजकीय पटलावर वाद निर्माण झाला आहे. एकीकडे महायुतीत यावरून संघर्षाची ठिणगी पडली असून, दुसरीकडे आता वन्यजीवांच्या अधिवासालाच मोठा धोका निर्माण झाला आहे. वृक्षतोडीच्या ठिकाणी एक उदमांजर मृतावस्थेत आढळून आले असून, नीलगाय आपल्या पिल्लासह जंगलाबाहेर वावरताना दिसत आहे. यावरून पुन्हा एकदा टोरंट पॉवर प्रकल्पाविरोधात वन्यजीव अभ्यासक आणि प्राणीमित्र संघटनांमध्ये संताप वाढला आहे. मृत्यूच्या कारणांचा सखोल तपास करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कर्जत तालुक्यातील साईडोंगर परिसरातील २३३ हेक्टर वनजमीन टोरंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी देण्यात आली आहे. या ठिकाणी कंपनी प्रशासनाकडून पाच हजारांहून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली आहे. याच वृक्षतोड झालेल्या परिसरात एक उदमांजर मृतावस्थेत आढळून आले असून, त्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली आहेत.
मृत उदमांजराचा मृत्यू वृक्षतोडीदरम्यान झाड अंगावर पडल्याने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे पर्यावरणवादी संघटना आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
धक्कादायक म्हणजे, इंडियन सिव्हेट कॅट अर्थात लहान भारतीय उदमांजराचा वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ मधील अनुसूची एकमध्ये समावेश आहे. त्यामुळे या वन्यप्राण्याची शिकार करणे किंवा त्याला मारणे हा गंभीर गुन्हा आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणात कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, आता या प्रकरणात वन अधिकाऱ्यांसह कंपनीच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उदमांजराच्या मृत्यूने पर्यावरणप्रेमी संतप्त
एकीकडे उदमांजराचा मृत्यू झाल्याने पर्यावरणवादी संघटना तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच उल्हास नदीलगत असलेल्या वावे गावाच्या हद्दीत नीलगाय आणि तिचे पिल्लू वावरताना दिसत आहे. याचे कारण भीमाशंकर अभयारण्य आणि परिसरातील जंगलात टोरंट प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड असल्याचा दावा केला जात आहे.
भीमाशंकर अभयारण्य परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीमुळे पक्षी आणि वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम होत असल्याची चिंता पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. शासनाकडून ३२ हजार ४८० झाडे तोडण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात सुमारे तीन लाख झाडांची तोड होणार असल्याचा दावा स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी केला आहे. यामुळे ही झाडे तोडल्यानंतर या जंगलात पक्षी आणि वन्यप्राणी राहणार तरी कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वृक्षतोडीमुळे वन्यप्राण्यांचे स्थलांतर?
दरम्यान, या वृक्षतोडीचा सर्वाधिक फटका वन्यजीवांना बसत असल्याचे चित्र दिसत आहे. जंगलातील नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्याने अनेक प्राणी सुरक्षित निवारा आणि पाण्याच्या शोधात अन्य भागांकडे स्थलांतर करत आहेत. याचाच प्रत्यय वावे गावात आला आहे.
टोरंट प्रकल्पासाठी वृक्षतोड सुरू असलेल्या परिसरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या उल्हास नदी परिसरात नीलगाय आणि तिचे पिल्लू दिसून आले. तसेच नीलगायीने भातशेतात प्रवेश करून पिकाचे नुकसानही केले. रात्रभर तिचा शोध घ्यावा लागला. दरम्यान, पाली-साईडोंगर परिसरातील जंगलातून नीलगायीसह अन्य वन्यप्राणीही बाहेर पडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. जंगलतोडीमुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासाचा प्रश्न निर्माण झाला असून, या परिस्थितीमुळे प्राणीमित्र आणि पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.