

Ratnagiri Drought Crisis News : राज्यशासनाने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये ‘Trigger-1’ लागू करत दुष्काळ जाहीर केला आहे. याबाबत शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी शासन निर्णय काढला आहे. तर यात रत्नागिरी जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश आहे. यावरून आता राजकीय टीका होताना दिसत असून उर्वरित सहा तालुक्यात देखील दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जात आहे. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी टीका केली होती.
दरम्यान आता उर्वरित सहा तालुक्यांतही दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. तर या तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेटच्या बैठकीत करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच उद्यापासून शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असून, दुष्काळाच्या स्थितीत जनतेनेही साथ देण्याचे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी सामंत म्हणाले, आज आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत दुष्काळी आढावा घेतला आहे. उर्वरित तालुक्यांतही पाऊस नसल्याने तिथेही दुष्काळ जाहीर करण्याचे शिफारसपत्र जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्य सचिवांकडे तातडीने पाठवण्यात येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त २६८१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. काही तालुक्यांत पावसाचे प्रमाण ६० ते ६५ टक्क्यांवर आले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आगामी काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता नाही, ज्यामुळे दुष्काळाची तीव्रता आणखी वाढू शकते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हिताचे विविध महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात जलयुक्त शिवारअंतर्गत २३३ गावांत कामे सुरू असून, मोठ्या २० धरणांत ८२ टक्के पाणीसाठा आहे. आंबाबोर्डावर लवकरच सदस्यांची नियुक्ती केली जाईल.
त्यामुळे आंबा व काजूबोर्डामार्फत ९० दिवसांत कायमस्वरूपी मार्ग काढण्यात येईल. काजूपिकांवर दुष्काळाचा होणारा परिणाम तपासून बागायतदारांना तातडीने दिलासा देण्यात येणार आहे. वीज बिल वसुलीला स्थगिती, कर्ज पुनर्गठन केले जाईल. पाणीटंचाईचा आराखडा लवकरच तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पत्रकार परिषदेला आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी उपस्थित होते.
सत्कार, काजू, बदाम बंद
दुष्काळजन्य परिस्थिती असताना सत्कार स्वीकारणे आणि शाली घालणे अयोग्य असल्याने, प्रशासकीय अधिकारी, मंत्री आणि आमदारांना आजपासून सत्कार स्वीकारण्यावर बंदी घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच काजू, बदाम आणि पिस्ते हे प्रकार १०० टक्के बंद झाले पाहिजेत आणि हे फक्त दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये नव्हे तर कायमस्वरूपी बंद झाले पाहिजेत. जिल्हा नियोजनच्या बैठकीनंतरही अत्यंत साधे जेवण देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे डॉ. सामंत म्हणाले.
दहा हजार बंधाऱ्यांचे नियोजन जिल्ह्यात एकूण दहा हजार वनराई बंधाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. एकाच दिवसांत किमान दोन हजार नवीन बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दुष्काळजन्य स्थितीत प्रथम पिण्याच्या पाण्याचा साठा, जनावरे आणि मग उद्योजकांसाठी पाणीपुरवठा केला जाईल. उद्योजकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन सामंत यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.