

खोपोली नगरसेविकेचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येमुळे रायगड जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या हत्येमागे राजकीय वैर असल्याचा आरोप शिवसेनेकडून होत असून राष्ट्रवादीने आरोप फेटाळले आहेत.
प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी SIT नेमण्याची मागणी जोर धरत आहे.
Raigad Crime News : रायगडमधील खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखेंची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अवघ्या चार दिवसातच झालेल्या या हत्येच्या घटनेमुळं राज्यात खळबळ उडालीय. या हत्येला आमदार महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांच्यातील राजकीय वादाची झालर असल्याचे आता बोलले जात असून सुरू असलेल्या चर्चे दरम्यान राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना असा राजकीय वाद सुरू झाला आहे. शिंदेंचे आमदार थोरवे आणि मंत्री भरत गोगावले यांनी या प्रकरणात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेच यांना जबाबदार धरले असताना तटकरे यांनी खोपोली गाठत आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बाजू घेत सर्व आरोप फेटाळले आहेत. सोबत या घटनेचे खरे सत्य बाहेर येण्यासाठी थेट 'SIT'च्या मागणी केली आहे. मात्र खोपोलीत जावूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त गोल गोल प्रतिक्रिया दिल्याची येथे चर्चा सुरू झाली आहे.
खोपोलीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची शुक्रवारी मुलाला शाळेतून सोडून घरी परतत असताना हत्या करण्यात आली. मंगेश यांची चार ते पाच जणांच्या टोळक्याने भर रस्त्यात तलवार, कोयत्याने 24 ते 27 वार करून हत्या केली. याचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला असून तो अंगावर शहारे आणणारा आहे. यानंतर आता रायगडसह राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खोपोलीकडे धाव घेतली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोपोलीला जावून मंगेश काळोखे यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी, काळोखे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वनही केले. यावेळी त्यांनी, मंगेश काळोखे यांची हत्याही राजकीय सुडा पोटी करण्यात आली. घरावर पाळत ठेवून अशा पद्धतीने ठार मारण्यात आले. त्यामुळे त्याच्या परिवारासह इथल्या जनतेच्या भावना देखील अतिशय तीव्र झाल्या आहेत. म्हणून जे जे कोणी या केसमध्ये आरोपी आहेत. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल.
विशेष सरकारी वकील देऊन ही केस फास्ट ट्रॅकवर नेली जाईल. तर अशा प्रकारच्या वृत्ती आणि गोष्टींना ठेचून काढण्यासह अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी कठोर कारवाई केली जाईल. अशा प्रवृत्तीच्या लोकांना फासावर लटकवले पाहिजे असे म्हटले असेही शिंदेंनी यावेळी म्हटलं आहे. तर या प्रकरणाचा योग्य तो तपास पोलिसांनी अधिक तीव्रतेने करावा, अशाही सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या. तर या हत्येमागे जे कोणी असतील ते कदापी सुटणार नाहीत. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवू अशीही ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान खोपोली येथील मंगेश काळोखे हत्या प्रकरणात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असून शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या हत्येचा कट राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या घरी शिजल्याचा गंभीर आरोप केलाय. त्यांनी तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करताना, रविंद्र देवकर याने हत्या होण्याच्या आदल्या दिवशी सुतारवाडी येथे जाऊन सुनिल तटकरे यांची भेट घेतली. तर या भेटीतच मंगेश काळोखे यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर ज्या पद्धतीने ते घारे यांना क्लिनचिट देत आहेत. त्यांनी याचा तपास केला आहे का? तेच रायगडचे आका असल्याचा गंभीर आरोपही थोरवे यांनी यावेळी केला आहे.
आता या आरोपानंतर तटकरे यांनी, 'खूप काय बोलायचं आहे पण योग्य वेळेला ते बोलण्याची संधी आम्हाला देईल', असे सूचक विधान करताना, खोपोलीची घडलेली घटना अत्यंत निंदणीय असून आपण कठोर शब्दांमध्ये याचा निषेध करतोय. तपास यंत्रणांनी वेगात याचा तपास करून आरोपींना पकडावे. त्याच्यांवर कठोर कारवाई करावी. त्यांचे केव्हापासूनच काय वादविवाद होते, दोन-तीन दिवस अलीकडे काय काय चाललेलं होतं. त्या संदर्भातले सुद्धा माहिती पोलीस विभागाने घ्यावी, ती त्यांच्याकडे नक्कीच असावी.
पण मला विश्वास आहे की सुधाकर घारे हे माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असून त्यांचा या प्रकरणाची संबंध नसेल. पण शेवटी तपास चालू असल्यामुळे तपासात अडथळा होईल असं कुठले वाक्य मी त्या ठिकाणी करणार नाही. पण मुख्यमंत्र्याना या घटनेमध्ये काय काय आहे हे सर्व बाहेर आलं पाहिजे. या घटनेतील धागेदोरे बाहेर आले पाहिजेत. कोणी काय काय केलंय हे सुद्धा बाहेर यायला हवं. यासाठी 'SIT'ची मागणी केलीय. तर यातून सर्व गोष्टी बाहेर येतील असाही इशारा त्यांनी दिला आहे. तसेच योग्य वेळी बरचं काही बोलेण असाही सूचक इशारा शिवसेनेच्या नेत्यांना नाव न घेता दिला आहे.
Q1. मंगेश काळोखे यांची हत्या कुठे झाली?
👉 रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात भर रस्त्यावर.
Q2. या हत्येमागे राजकीय कारण आहे का?
👉 प्राथमिक चर्चांनुसार राजकीय वैराची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Q3. या प्रकरणात कोणाकोणाची नावे पुढे आली आहेत?
👉 राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी तसेच स्थानिक नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
Q4. SITची मागणी कोणी केली आहे?
👉 राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी SIT चौकशीची मागणी केली आहे.
Q5. या घटनेनंतर रायगडमध्ये परिस्थिती कशी आहे?
👉 नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून राजकीय तणाव वाढलेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.