Budget 2024 Analysis : 'दहा वर्षांत विकासाची टिमकी वाजवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकार आणि भाजपला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आरसा दाखवला. त्यांनी जड अंतरकणाने शेवटचा अर्थसंकल्प मांडताना देशात आणखी वंचितांसाठी काम करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित सांगितले. त्यांच्या या धडसाचे कौतुक करतो,' असा टोला लगावत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बजेटवर टीका केली.
आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोन दिवसांच्या रायगड जिल्हा दौऱ्यावर आहेत. पेण येथे बोलताना त्यांनी बजेटचे वाभाडे काढले. ते म्हणाले, 'निर्मला सीतारमण यांनी जड अंतकरणाने मांडलेला हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. दहा वर्षांनंतरही देशात आणखी अनेक समूह आहेत, की त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी धाडसाने सांगतले. त्यांच्या धाडसाचे मी कौतुक करतो,' असा टोला ठाकरेंनी लागावला.
'अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सीतारमण (Sitaraman) यांनी यापुढे आम्ही या देशात चार जातींसाठी काम करणार असल्याचे सांगितले. त्या म्हणजे गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी. खुद्द पंतप्रधान मोदी समोर बसलेले असताना त्यांनी हे बोलण्याचे धाडस केले की देश म्हणजे तुमच्या आजूबाजूचे सुटाबुटात बसलेले मंत्री, मित्र नाही. तर त्यांच्या पलीकडेही हा देश आहे. त्यात तरुण आहेत, शेतकरी, महिला आणि गरीबांचाही समावेश आहे. आता निवडणुका आल्यानेच त्यांना या चार जाती आठवल्या,' असा घणाघात ठाकरेंनी मोदींसह भाजपवर केला.
यानंतर ठाकरेंनी केंद्र सराकरसह भाजपला उद्देशून अनेक प्रश्न उपस्थित केले. 'तुमच्यासोबतच अदानी वगैरे आहेत, तेवढा देश नाही की ज्यांच्यासाठी तुम्ही देशाची दहा वर्षे खर्ची घातली. हे सुटाबुटातल्या सरकारला आता गरिबांकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला आहे. आता दहा वर्षानंतर तुम्हाला या चार जाती आठवल्या का?' असा थेट सवाल ठाकरेंनी सीतारमण यांच्यासह मोदींना केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'आता महिलांकडे लक्ष देत आहात, तर मग तुम्ही मणिपूरमध्ये का जात नाही ? मणिपूरमध्ये जाऊन अत्याचार झालेल्या महिलांना सांगा, की अहो आम्हाला माहितीच नव्हते की आमच्या देशात महिला आहेत. आता आम्हाला कळले की निवडणुकीमध्ये महिलांची मत पाहिजेत म्हणून.. आम्ही सांगतो आहोत की आम्ही आता महिलांसाठी काम करणार,' अशा आपल्या शैलीत ठाकरेंनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावरही निशाणा साधला.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.