Uddhav Thackeray On Barsu : उद्धव यांची ‘रिफायनरी’ भूमिकेवर पुन्हा एकदा अळीमिळी गुपचिळी!

Uddhav Thackeray Stand On Barsu refinery project : कोकणवासीयांच्या पदरी निराशा
Uddhav Thackeray On Barsu
Uddhav Thackeray On BarsuSarkarnama
Published on
Updated on

संजय परब -

Konkan News : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे कोकण जनसंवाद यात्रेत बहुचर्चित वादग्रस्त बारसू रिफायनरीवर ठाम भूमिका घेऊन हा विनाशकारी प्रकल्पच नको, अशी ठाम भूमिका घेतील, असा कोकणवासीयांना मोठा विश्वास वाटत होता. पण, उध्दव यांनी पुन्हा एकदा रिफायनरीवर अळीमिळी गुपचिळी करत आपल्या हक्काच्या मतदारांना साफ निराश केले आहे. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray On Barsu
Satara NCP News : जयंत पाटील म्हणाले, पर्याय नाही ; तर परतफेडीचा शशिकांत शिंदेंनी कोणाला दिला इशारा ?

उध्दव ठाकरे यांची कोकण जनसंवाद यात्रा गाजली. सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करत त्यांनी शिवसेनेसाठी वातावरण चांगले निर्माण केले. निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये जोश भरण्याचे काम केले. पण, जो कोकण शिवसेनेच्या पडत्या काळात मातोश्रीच्या बाजूने भक्कम उभा राहिला आहे, तो विनाशकारी प्रकल्पापासून आम्हाला वाचवा, अशी आर्त हाक मारत असताना त्यावर जाहीर भूमिका घेण्याचे उद्धव यांनी टाळले.

या यात्रेत ते बारसू सोलगाव येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प ठिकाणी जाऊन परिसरातील जनतेशी त्यांना संवाद साधता आला असता आणि सभेत यावर विरोधी भूमिका घेऊन कोकणाला व तेथील जनतेला दिलासा दिला असता, पण तसे काहीच झाले नाही. यामुळे राजापूर भागातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray On Barsu
Rajya Sabha Election 2024 : कुमार विश्वास यांना राज्यसभेची उमेदवारी? भाजप देणार धक्का...

प्रकल्पाच्या जवळ असलेल्या धूतपापेश्वर मंदिराचे उध्दव दर्शन घेतात, पण रिफायनरी नको म्हणून आक्रोश करणाऱ्या जनतेला भेटून ते विश्वास देऊ शकत नसतील, तर एकूणच शिवसेनेचा या प्रकल्पाकडे बघण्याचा हेतू नक्की काय आहे? अशी शंका निर्माण होते. रिफायनरी विरोधी समितीच्या लोकांनी त्यांची चर्चेसाठी वेळ मागितली होती. पण, त्यांना धावती भेट देत, “येथील जनतेला हा प्रकल्प नको असेल तर होणार नाही” असे मोघम उत्तर देऊन, त्यांची बोळवण करण्यात आली. (Uddhav Thackeray Stand On Barsu Refinery Project)

“असे संदिग्ध उत्तर तर उध्दव ठाकरे सत्तेत असतानासुद्धा देत होते. यात काहीच नवीन नाही. मात्र या भागातील जमिनीची पाहणी आणि भू-सर्वेक्षण झाले त्यावेळी झालेल्या प्रचंड आंदोलनात येथील जनतेला झालेला त्रास हा त्यांना रिफायनरी नको, असेच सांगणारा होता. मग उध्दव यांना आणखी काय हवे आहे”, असा सवाल रिफायनरी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. राजापूरच्या सभेत उध्दव यांनी एका शब्दाने रिफायनरी विरोधात भूमिका घेतली नसली, तरी उगाचच खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांनी दोन शब्द बोलत आपण रिफायनरी विरोधात असल्याचे दाखवले. निवडणुका तोंडावर असल्याने लोकप्रतिनिधी असा देखावा करत असल्याचे ग्रामस्थ बोलत आहेत.

उध्दव ठाकरे हे कोकणातील जनतेला हा प्रकल्प नको असेल तर तो होणार नाही, असे सांगत असले तरी त्यांनीच नाणार रिफायनरीसाठी पर्यायी जागेचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिल्याचं समोर आले होते. या विषयीच्या एका पत्राचा दाखला देण्यात आला होता. स्वतः मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी 12 जानेवारी 2022 ला पंतप्रधान मोदींना रिफायनरी संदर्भात पत्र लिहिलं होतं. या पत्रात ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकार रिफायनरीबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं होतं आणि या सोबतच रिफायनरीसाठी नव्या जागेचा प्रस्ताव दिला होता. ही जागा बारसू सोलगावची होती.

बारसू रिफायनरीसाठी जवळपास 14 हजार एकर जमीन आणि बंदरांसाठी जवळपास 2414 एकर जागा देण्याची तयारी त्यावेळी राज्य सरकारने दाखवली होती. 13 हजार एकर जमीन राजापूर तालुक्यातील बारसूसाठी दिली जाऊ शकते. तसंच नाटे येथील 2 हजार एकर समुद्र किनाऱ्याची जमीन बंदर उभारणीसाठी दिली जाऊ शकते, असं उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटलं होतं.

7 जानेवारी रोजी बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना उध्दवजींना मातोश्रीला भेटली होती. त्यांनी मी बारसू येथे कातळशिल्प बघायला लवकरच येतो, असे आश्वासन दिले. तेव्हा तुम्ही तिकडे यालाच म्हणजे आपोआप रिफायनरीचा विषय निघेलच, असे ते म्हणाले होते. उध्दव यांचा दौरा जानेवारी तिसऱ्या आठवड्यातच ठरला. 5 फेब्रुवारी रोजी 1 ते 1.30 दरम्यान बारसू-देवाचे गोठणे नक्की होते. पण काय झालं कुणास ठाऊक? बारसू देवाचे गोठणे रद्द होऊन जवाहर चौक सभा व धुतपापेश्वर मंदीर एवढाच दौरा नक्की झाला. बारसू येथील उध्दवजींचा दौरा का रद्द करण्यात आला? असा सवाल बारसूचे ग्रामस्थ करत आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com