
Sindhudurg, 10 January : विधानसभा निवडणुकीत नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. पुण्यातील पाच माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडून भाजपत प्रवेश केला आहे, तर कोकणातील निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार राजन साळवीही पक्ष सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्या पाठोपाठ विधानसभा निवडणूक लढवलेल्या नेत्याने तर थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली आहे, त्यामुळे कोकणात ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवलेले राजन तेली (Rajan Teli) यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. मात्र, त्या भेटीबाबत तेली यांनी स्पष्टीकरण देताना बावनकुळेंना राजकीय कारणांसाठी भेटलो नसून वैयक्तिक कारणांसाठी भेटलो असल्याचे म्हटले आहे.
राजन तेली यांच्या अगोदर कोकणातील (Konkan) राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे. राजन साळवी यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्या पराभवाला पक्षातील नेते जबाबदार असल्याचा आरोप साळवी यांचा आहे. त्या निवडणुकीत पक्षातील कोणी कोणी विरोधात काम केले, त्याचा अहवालही पाठविण्यात आला आहे. मात्र, त्यावर कार्यवाही होत नसल्याने ते नाराज आहेत.
दरम्यान, राजन साळवी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली आहे. मातोश्रीवरील भेटीत खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. त्या भेटीत मिळालेल्या वागणुकीवरून माजी आमदार साळवी हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. नाराज साळवी हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. कारण इनकम टॅक्सच्या चौकशीनंतरही साळवी हे ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले होते. मात्र, एकनिष्ठ राहूनही पक्षाकडून योग्य सन्मान मिळत नसल्याची साळवी समर्थकांची भावना आहे.
साळवीनंतर कोकणातील राजन तेली हेही भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. राजन तेली यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे, त्यामुळे तेली यांची घरवापसी होणार असल्याचे मानले जात आहे. मात्र, तेली यांनी त्याचा इन्कार करताना वैयक्तिक कारणांसाठी मी बावनकुळे यांची भेट घेतली आहे, असेही सांगितले आहे.
कोण आहेत राजन तेली?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजन तेली हे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीपर्यंत ते भाजपचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष होते. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. कणकवलीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. मात्र, केसरकर यांच्या विरोधात त्यांना पराभव पत्कारावा लागला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.