दाभोळ : केंद्रीय मंत्र्यांसाठी आवश्यक तो शिष्टाचार पाळला न गेल्याने केंद्रीय राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल ( Prahlad Singh Patel) यांनी आपला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण (Konkan) कृषी विद्यापीठातील कार्यक्रम रद्द केला. या मानापमान नाट्यात उद्योजकांना मात्र नाहक त्रास सोसावा लागला. (Union Minister canceled the program at Konkan Agricultural University due to lack of etiquette)
केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल हे येथील सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी व आढावा बैठकीसाठी दापोली येथे आले होते. त्यांच्या कार्यक्रमाचे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात आयोजन करण्यात आले होते. शिवाय ते विद्यापीठाच्या किसान भवन या अतिथीगृहात मुक्कामाला होते. ते शुक्रवारी (ता. ७ एप्रिल) रात्री किसान भवन येथे दाखल झाले होते.
शनिवारी (ता. ८ एप्रिल) सकाळपर्यत विद्यापीठात होते. शनिवारी सकाळी ते जालगाव येथील पद्मश्री पुरस्कार प्राप्त भि. रा. तथा दादा इदाते यांना भेटण्याकरिता त्यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले. तोपर्यंत विद्यापीठातील एकाही अधिकाऱ्याने त्यांच्याशी संपर्क साधला नाही किंवा त्यांची भेट घेतली नाही. आपली चूक लक्षात आल्यावर विद्यापीठातील काही कर्मचारी मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना भेटण्याकरिता पुष्पगुच्छ घेऊन पद्मश्री दादा इदाते यांच्या निवासस्थानी दाखल झाले. मात्र, तेथे देखील पटेल यांनी विद्यापीठाचा पुष्पगुच्छ नाकारला.
झाल्या प्रकारची केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी गंभीर दखल घेतली. यामुळे त्यांनी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेला उद्योजकांशी संवाद या कार्यक्रमाचे स्थान बदलण्यास सांगितले. त्यानंतर हा कार्यक्रम दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. मात्र या बदलाची माहिती अनेकांना देण्यात न आल्याने अनेक उद्योजक प्रथम कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयात असलेल्या सभागृहात गेले. मात्र कार्यक्रमाचे स्थळ बदलण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आल्यावर या सर्वांना दापोली अर्बन कॉलेजच्या सभागृहात यावे लागले, त्याचा त्रास अनेकांना सहन करावा लागला.
आपल्या भाषणात प्रल्हाद सिंह पटेल यांनी कृषी विद्यापीठाबाबत नाराजी व्यक्त केली. याच कार्यक्रमात कुलगुरू डॉ. संजय सावंत हे त्यांचे स्वागत करण्याकरिता उपस्थित होते. मात्र, कुलगुरू डॉ संजय सावंत यांचा पुष्पगुच्छ केंद्रीय मंत्री पटेल यांनी नाकारला. शिवाय विद्यापीठाला स्थानिक प्रक्रिया उद्योजकांच्या प्रदर्शनापासून देखील दूर ठेवले, याची जोरदार चर्चा दापोलीमध्ये सुरू होती.
जबाबदारी एकमेकांवर ढकलली अन नाराजी पदरी आली...
केंद्रीय राज्य मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या स्वागताला जाण्याची जबाबदारी आपली नाही, असे म्हणत अनेक अधिकाऱ्यानी त्यांच्या स्वागताला जाणे टाळले. शेवटी व्हायचा तो परिणाम झालाच. सकाळी आठपर्यंत कोकण कृषी विद्यापीठाचा एकही जबाबदार अधिकारी किसान भवन येथे फिरकलाच नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.