
Sindhudurg News : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे देशात दुखवटा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौरा अर्धवट सोडून पाकिस्तानविरोधात काही कठोर निर्णय घेण्यासाठी भारतात परतले. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदारीचे भान विसरून वागले. कुडाळमध्ये आभार सभा घेऊन त्यांनी हार, तुरे स्वीकारत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला, सर्वेच्च न्यायालयाच्या आदेशाचीही त्यांनी पायमल्ली केली असा आरोप शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी केला. ते कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी ठाकरे गटाचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख सतीश सावंत, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मधुरा पालव, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, युवासेनेचे तालुकाप्रमुख उत्तम लोके, सी. आर. चव्हाण आदी उपस्थित होते.
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी 22 एप्रिलला भ्याड हल्ला करत बेछूट गोळीबार केला. दहशतवाद्यांनी केलल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. धक्कादायक म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांचे नावं विचारून, आयकार्ड पाहून गोळीबार केला होता. यात महाराष्ट्रातील 6 जणांचाही समावेश होता. या घटनेमुळे राज्यासह देशात दुखवटा पसरला आहे.
एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यादरम्यान दोन दिवसीय सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरून देशात परतले. बैठक घेऊन पाकिस्तानविरोधात मोहिम उघडण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केलं. यावेळी दहशतवादाविरोधात एकमुखाने लढण्याचे ठरवले. मात्र आधी मदतीचा बडेजाव करत पहलगामला गेलेल्या एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता संपली. त्यांच्यासह त्यांच्या नेत्यांनी कुडाळ येथील आभार सभेत जल्लोष साजरा केल्याचा दावा राऊत यांनी केला.
शिंदे यांनी श्रीवर्धन ते गोवा आणि गोवा ते कुडाळ असा प्रवास करत कुडाळच्या आभार सभेत हार, तुरे स्वीकारत जल्लोष केला. देशात दुखवटा असताना राज्यातील जबाबदार मंत्र्यांकडून अशोभनीय असे कृत्य करण्यात आले. सर्वेच्च न्यायालयाने घालून दिलेल्या आदेशाची पायमल्ली करताना त्यांनी रात्री साडेअकरापर्यंत भाषण केलं. यामुळे आता त्यांच्यावर ध्वनिक्षेपक नियमांचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राऊत यांनी केलीय.
तसेच आभार सभेदिवशी 400 लोकांच्या उपस्थितीत प्रचंड मोठी सभा झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासाचा डांगोरा पिटण्याचे काम केले. आमदार नीलेश राणे यांनी भीष्मप्रतिज्ञा करत मरेपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या पक्षात राहणार, असे जाहीर केले आहे. मात्र, ज्या बाळासाहेबांनी नारायण राणे व त्यांच्या मुलांना राजकीय व्यासपीठ दिले, त्या शिवसेनेशी राणेंनी गद्दारी केली. ज्या काँग्रेसमध्ये राणेंना मंत्रिपदे दिली, त्यांचा पक्ष संपवण्याचा इशारा दिला होता. ज्या भाजपने राणे पित्रा-पुत्रांना राजकीय स्थिरता दिली. मात्र, नीलेश राणे भाजपशी एकनिष्ठ राहिले नाहीत. आयत्या उमेदवारीसाठी पक्ष सोडला, यासारखा दुसरा विनोद होऊ शकत नसल्याचीही टीका विनायक राऊत यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.