
Sindhudurg News : आगामी स्थानिकच्या तयारीत सत्ताधाऱ्यांसह विरोधकही लागले आहेत. येथे सत्ताधाऱ्यांचे दोन आमदार आणि एक मंत्री असल्याने 'स्थानिक'चा पेपर सोपा जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. पण येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या हातात आगामी स्थानिकसाठी सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. अशातच ठाकरे गटाकडून पक्ष बांधणीसह प्रवेशाकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. यासाठी माजी खासदार विनायक राऊत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष लक्ष देताना दिसत आहेत.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर फटका बसलेल्या शिवसेनेची येथे पिच्छे हाट झाली आहे. जिल्हाध्यक्ष संजू परब यांच्यासह अनेक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेचं (शिंदे) धनुष्य बाण हाती घेतलं आहे. यानंतर अद्याप शिवसेनेला जिल्ह्यात उभारी मिळताना दिसत नसून आहेत ते कार्यकर्ते आणि नेत्यांना धरून ठेवण्याची तारेवरची कसरत राऊत यांना करावी लागत आहे.
अशातच त्यांनी आता आपला मोर्चा कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर असणाऱ्या अर्चना घारे-परब यांच्याकडे वळवला आहे. राऊत यांनी, विधानसभा निवडणुकीत आम्ही कमी पडलो. पण आता अर्चना घारे-परब यांनी आमच्याकडे यावे, यासाठी त्यावेळीदेखील विनंती केली होती. त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीच्या प्रामाणिक कार्यकर्त्या आहेत. आमचे सगळे पदाधिकारी त्यांचे काम करण्यास इच्छुक होते. त्या शिवसेनेत आल्या असत्या तर निश्चितच संधी दिली असती. भविष्यात येणार असतील तर त्यांचे स्वागत करू, अशी ऑफरच राऊत यांनी यावेळी दिली. अर्चना घारे-परब यांनी विधानसभेच्या तोंडावर तिकीट मिळणार नसल्याने अपक्ष निवडणूक लढवली होती. पण त्यांना यश आले नव्हते. मात्र त्यांच्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका बसला. पण आता या ऑफरचीच जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.
तसेच त्यांनी, ठाकरे शिवसेनेतील कार्यकर्ते मजबूत आहेत. ते विकले जाणारे नाहीत. प्रामाणिक कार्यकर्त्यांची कमी आमच्याकडे नाही. विकाऊ लोक आमच्याकडे नाहीत. निवडणुकीवेळी काही गोष्टी नाईलाजास्तव कराव्या लागतात अशी कबूली दिली आहे. पण आपण आणि शिवसेना पक्ष प्रामाणिक कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करणार नसल्याचीही त्यांनी ग्वाही दिली आहे.
दरम्यान त्यांनी शक्तिपीठ महामार्गावरून महायुतीवर टीकास्त्र सोडताना, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये म्हणून शक्तिपीठ होऊ देणार नाही, अशी आश्वासने सरकारमधील मंत्र्यांनी दिली होती. मात्र, आता सत्तेचा दुरूपयोग करून जबरदस्तीने तो शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारला जातोय. पण शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभी राहणार आहे. शक्तिपीठ महामार्ग हा जनतेसाठी नसून तो ठेकेदाराच्या माध्यमातून मंत्र्यांचे खिसे भरण्यासाठी? असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
त्यांनी माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली असून, राणेंनी पोकळ धमक्या देऊ नयेत. ‘बघून घेऊ’ अशी भाषा ते करत आहेत. त्यांचा मूळ स्वभाव अद्याप बदललेला नाही. पण आम्ही शेतकरी, बागायतदारांच्या मागे उभे असून त्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांची हिंमत असेल तर त्यांनी विरोध करावा, असे आव्हानही राऊत यांनी दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.