

नेरळमधील ममदापूर नाक्यावर शाब्दिक वादातून कार्यकर्त्यावर चाकूहल्ला झाला.
या प्रकरणात नेरळ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
गुन्हा दाखल होऊ नये यासाठी दबाव टाकण्यात आल्याची चर्चा आहे.
Raigad News : रायगडमधील खोपोली हत्याकांड प्रकरण अद्याप शांत झाले नसून या हत्येचा मास्टरमाइंड राष्ट्रवादीचा जिल्हा प्रवक्ता भरत भगतला अखेर पोलिसांनी अटक केली. पण या प्रकरणात गुन्हा नोंद असलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे अद्याप फरार असून त्यांना अटक करण्याची मागणी होत आहे. येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचीत नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता नेरळ येथे राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सुनीता टोकरे यांचे पती रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. पण यावेळी कार्यकर्तामध्ये आल्याने तो जखमी झाला असून त्याच्या पोटाला गंभीर जखम झाली आहे.
रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत वाद शिगेला पोहचला आहे. येथे मंत्री भरत गोगावले आणि त्यांचे आमदार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर तुटून पडताना दिसत आहेत. हा वाद वाढलेला असतानाच खोपोली येथील शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही हत्या २६ डिसेंबर रोजी करण्यात आली होती.
त्यांच्यावर तलवार, कुऱ्हाड आणि कोयत्याने तब्बल २७ वार करण्यात आले होते. यानंतर या हत्येचा मास्टरमाइंड राष्ट्रवादीचा जिल्हा प्रवक्ता भरत भगत आणि मुख्य मारेकऱ्यांसह १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर नगरपरिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी २० लाखांची सुपारी देऊन मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. ज्यानंतर रायगडमध्ये पुन्हा एकदा राजकारणाचा रक्तरंजित खेळ सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली होती.
आता या चर्चांना पुर्णविराम लागतो न लागतो तोच कर्जत तालुक्यात खोपोली सारखी घटना घडली आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून मतदानाला आता फक्त एकच आठवडा शिल्लक आहे. याचदरम्यान नेरळ जिल्हा परिषद गटात धक्कादायक घटना घडली असून ममदापूर नाक्यावर तीन जणांच्या टोळक्याने राजकीय वादातून एका तरुणावर चाकू हल्ला केला आहे. या प्रकरणी दोघांना नेरळ पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण धक्कादायक म्हणजे हा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी राजकीय दबाव टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नेरळ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सुनीता टोकरे यांचे पती रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे हे आपल्या कार्यकर्त्यांसह ममदापूर नाक्यावर चर्चा करत होते. यावेळी मध्यरात्री गावातील धनेश शिंगे आणि सुरेश टोकरे यांच्यात वाद झाला. यावादानंतर टोकरे यांच्याबरोबर असणारे सहकारी विशाल हिसाळके तेथून निघून गेला. त्यापाठोपाठ टोकरे देखील पुढे निघून गेले.
पण काहीच अंतर गेल्यानंतर मिलिंद शिंगे याने विशाल हिसाळके यांच्यांशी वाद घालत धक्काबुक्की केली. याचवेळी तेथे आलेल्या रेशब कुरेशी आणि अरमान पटेल यांनी देखील विशाल यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. वाद इतका वाढला की मिलिंद शिंगे याने जवळच पार्क केलेल्या दुचाकी गाडीतील चाकूने विशाल यांच्यावर वार केले. पण ते विशाल यांनी चुकवले. मात्र शब कुरेशी आणि अरमान पटेल या दोघांनी केलेला हल्ल्याने घाव केला.
या दोघांनी केलेल्या हल्ल्यात विशाल यांच्या पोटाला मोठी इजा झाली असून पोटात मोठी जखम झाली आहे. त्यांना रायगड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा रायगडमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नेरळ पोलिसांनी फॉरेन्सिक टीम बोलावली आहे. तसेच जिल्हा पोलीस उपअधीक्षक राहुल गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट दिली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान नेरळ पोलिसांनी जखमी विशाल यांचा जबाब घेतला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र, हा गुन्हा दाखल होवू नये म्हणून पोलिसांवर दबाब टाकण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच नगर पालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीप्रमाणेच जिल्हा परिषद निवडणूकही रक्तरंजित निवडणूक होण्याच्या मार्गावर असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
FAQs :
Q1. नेरळमध्ये चाकूहल्ला कधी झाला?
👉 मध्यरात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
Q2. या घटनेत कोणाचा सहभाग होता?
👉 सुरेश टोकरे यांच्या उपस्थितीत शाब्दिक वाद झाला असल्याची माहिती आहे.
Q3. पोलिसांनी काय कारवाई केली?
👉 नेरळ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
Q4. ही घटना राजकीय कारणामुळे झाली का?
👉 प्राथमिक माहिती अनुसार ही घटना राजकीय पार्श्वभूमीत घडल्याची शक्यता आहे.
Q5. गुन्हा दाखल करण्यावर दबाव होता का?
👉 गुन्हा दाखल होऊ नये यासाठी दबाव टाकण्यात आल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.