

Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दिवसापासून व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपने मोठे वादळ आले आहे. दोन दिवसापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतच ऑडिओ क्लिपचा बॉम्ब फोडला. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. रामदास कदम यांनी भाजपवर आरोप करताच त्यांच्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी आरोप फेटाळून लावले.
त्यातच शनिवारी भाजप नेते प्रसाद लाड यांनी या प्रकरणाला आता वेगळे वळण दिले आहे. त्यांनी 500 कोटींच्या ऑडिओ क्लिप मागचे मास्टरमाइंड संजय राऊत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळेच आम्ही त्या ऑडिओ क्लिपची चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे लाड यांनी स्पष्ट केले.
दोन दिवसापूर्वी जरांगे पाटील यांनी 500 कोटींची ऑडिओ क्लिप व्हायरल केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यानंतर या सर्व प्रकाराला भाजप जबाबदार असून त्याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी करताना माजी मंत्री रामदास कदम यांनी भाजपाकडे बोट दाखविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी कदम यांच्या या वक्तव्यानंतर जोरदार पलटवार केला. या सर्व प्रकाराला भाजप जबाबदार, भाजपचे षडयंत्र असे बोलणे चुकीचे आहे. भाजपवर केलेले आरोप आम्ही सहन करणार नाही, असे म्हणत दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. तर त्यानंतर प्रसाद लाड यांनी देखील तातडीने पत्रकार परिषद घेत त्यांच्यावरील आरोप फेटाळले होते.
शनिवारी प्रसार माध्यमाशी बोलताना प्रसाद लाड (Prasad Lad) म्हणाले, 'आमच्यात आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कुठलही भांडण होणार नाही. आम्ही त्यांचा सन्मान करु. आम्ही ताकदीने त्यांच्यामागे उभे राहू. जे काय झाले ते चुकीचे होते. म्हणूनच आम्ही म्हणतोय त्या ऑडिओ क्लिपची चौकशी केली पाहिजे. ती ऑडिओ क्लिप कोणी, कशी कोणापर्यंत पोहोचवली, ती मनोज जरांगेंपर्यंत कशी गेली, ते शोधून काढले पाहिजे.'
यावेळी प्रसाद लाड म्हणाले की, सामनाच्या स्टुडिओमध्ये हे सर्व झाले, त्याची चौकशी झाली पाहिजे. याचा कर्ता, करविता संजय राऊत (Sanjay raut) आहेत, त्याला बोलावलचं पाहिजे. संजय राऊत यांचा मनसुबा कधी पूर्ण होऊ देणार नाही. फडणवीसांना बदनाम करण्याचा राऊतांचा मनसुबा आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये स्क्रिप्ट तयार करण्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
संजय राऊत यांना चांगले माहित आहे की, यापूर्वीही निवृत्त न्यायाधीशामार्फत निष्पक्ष चौकशा झाल्या आहेत. माजी आयएएस, आयपीएस अधिकारी नेमून चौकशी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मलिन करण्याचा संजय राऊतचा मनसुबा कधी यशस्वी होऊ देणार नाही, असे प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.