Mumbai : विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी काही तासांत उरलेले असताना सर्वच राजकीय पक्ष, नेते, उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी अखेरची धडपड करताना दिसत आहेत. आजही अनेक मतदारसंघात नेत्यांच्या प्रचारसभा, रोड सुरू आहेत. सांगता सभांमधून मतदानांना साद घातली जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही एका व्हिडिओच्या माध्यमातून मतदारांना भावनिक साध घातली आहे.
उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियात एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आज मी आपल्याकडे न्याय मागायला आलो आहे. हा न्याय व्यक्तिगत माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी, लोकशाहीसाठी मागायला आलो आहे. अडीच वर्षांपूर्वी आपलं सरकार चालू असताना कोणत्या पध्दतीने पाडण्यात आले आणि कोणत्या पध्दतीने नवीन सरकार आपल्या इच्छेविरोधात आपल्या माथ्यावर बसवण्यात आले?
अडीच वर्षांपासून आपण न्याय मागत आहोत, तो मिळत नाही. आपण असं म्हणतो, न्यायाला विलंब लागणे म्हणजे न्याय नाकारणे. हा न्याय नाकारला जातोय. शेवटी न्यायालयाकडून न्याय मिळत नसेल तर लोकमान्य टिळक म्हणतात त्याप्रमाणे तुमच्या सर्वोच्च न्यायालयात मी न्याय मागण्यासाठी आलो आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
आपला पक्ष चोरला, दिवसाढवळ्या दरोडा घातला. पक्षाचे नाव, चिन्ह चोरले. शिवसेनाप्रमुखांचा फोटोही चोरला. तरीदेखील केवळ आणि केवळ आपल्या आशीर्वादामुळेच मी ठामपणे उभा आहे. पण एक गोष्ट ते चोरू शकत नाहीत. तुमचे प्रेम, तुमचा विश्वास आणि आशीर्वाद. या एकाच गोष्टीवर मी बेबंदशाहीविरुध्द लोकशाहीची लढाई लढतोय, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
ही लढाई मला काही हवे म्हणून नाही तर या देशातील लोकशाही टिकवण्यासाठी मला तुमची सोबत पाहिजे, असे आवाहन करताना उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे की, या लढाईत केवळ माझ्या अस्तित्वाचा प्रश्न नाही, तर महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राला लुटायचे काम सुरू आहे. महाराष्ट्राला गुलाम बनवण्याचे काम सुरू आहे. आणि आपण ते डोळ्यादेखत होऊ द्यायचे? मला तरी हे पटत नाही.
या बेबंदशाहीविरोधात सगळ्यांनी सहकुटुंब उतरा. आपल्या कुटुंबात जेवढे मतदार आहेत, त्या सर्वांनी उतरा. जिथे-जिथे आपले उमेदवार आहेत, त्यांना भरघोस मते द्या. मी बाळासाहेबांची मशाल आहे, या जिद्दीने प्रत्येकाने उतरले आहे. या मशालीने ही बेबंदशाही मी जाळून टाकणारच, या त्वेषाने उतरा आणि जाळून भस्म करा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.