Nagpur News : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आज थांबेल. नागपूर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढती होत आहे. काँग्रेस आणि भाजपला जिंकण्याची समान संधी असल्याचे सध्या दिसून येत आहे. असे असले तरी भाजपचे नेते आणि नागपूर जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी आम्ही बारापैकी दहा जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे. हा निव्वळ ठोकताळा किंवा अंदाज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर जिल्ह्यात 2014 च्या निवडणुकीत भाजप महायुतीचे 11 आमदार निवडून आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपची सत्ता होती. त्यानंतरही भाजपला नागपूर जिल्ह्यातील यश कायम ठेवता आले नव्हते. शहरातील दोन आणि ग्रामीणमधील तीन उमेदवार भाजपचे पराभूत झाले होते.
महाविकास आघाडी एकत्रित असल्याने यावेळी भाजपला फार यश मिळणार नाही, असेच सर्वत्र बोलले जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ग्रामीणमधील रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुती पराभूत झाली तर शहरातही केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासारखा तगडा उमेदवार असतानाही मोठ्या प्रमाणात मताधिक्य घटले आहे. याचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना बसणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
मध्य, पश्चिम आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत होऊ शकते. ग्रामीणमधील उमरेड, सावनेर आणि काटोल तसेच रामटेक विधानसभा मतदारसंघातही विरोधक जास्त पॉवरफूल आहेत. या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निवडून येतील याची कोणालाच शाश्वती नाही. या सर्व पार्श्वभूमीवर कैलास विजयवर्गीय यांच्या दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजपच्या अंदाजानुसार, उत्तर नागपूर आणि उमरेड विधानसभा मतदासंघात अडचणी आहेत. विजयवर्गीय काही महिन्यांपासून नागपूर जिल्ह्यात ठाण मांडून बसले आहे. आतापर्यंत शेकडो लोकांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या आहेत. अतिशय बारकाईने ते निवडणुकीचे नियोजन करीत आहेत. भाजप कुठे कमी आहे, कुठे जास्त काम करायची गरज आहे याचा अचूक अंदाज त्यांनी आधीच घेतला आणि त्यानुसार तयारी केली आहे.
विजयवर्गीय हे बंगाल राज्याचे निवडणूक प्रभारी होते. मध्य प्रदेशच्या मंत्रिमंडळात आहेत. निवडणुकीचा दांडगा अनुभव त्यांना आहे. बंगारसारख्या कट्टर विरोधी राज्यात त्यांनी भाजपला मोठे यश मिळवून दिले आहे. त्यामुळे त्यांनी वर्तवलेल्या अंदाजाची चर्चा सुरू आहे. भाजपच्या अंदाजानुसार, उत्तर नागपूर आणि उमरेड विधानसभा मतदारसंघ अडचणीचे आहेत. मात्र, दहा मतदारसंघात पक्षाला यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.