

Maharashtra Mahapalika Elections News : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी आणि आज (बुधवारी) भाजपच्या बहुतांश शहरातील प्रचार कार्यालयात प्रचंड गोंधळ झाला. ‘तिकीट फिक्स आहे, तुम्ही कामाला लागा’, असा शब्द दिल्यानंतर ऐनवेळी तिकीट कापून भलत्यालाच उमेदवारी दिल्याने संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी अवघे प्रचार कार्यालय डोक्यावर घेतले. काहींनी आत्महदनाचा प्रयत्न केला तर काहींनी स्थानिक आमदार, मंत्र्यांवर गंभीर आरोप करून मनातील खदखद व्यक्त केला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी (ता.30) आणि बुधवारी प्रचंड राडा पाहायला मिळाला. संभाजीनगरमध्ये युती तुटल्यानंतर भाजपने उमेदवारांची नावे घोषित न करता थेट एबी फॉर्म देऊ केले. सकाळी 11 वाजता भाजपच्या प्रचार कार्यालयात मंत्री अतुल सावे आणि खासदार डॉ. भागवत कराड ‘व्हीआयपी’ कक्षात जाऊन बसले. त्याचवेळी नाराज कार्यकर्त्यांनी प्रचार कार्यालयात येत संतापला वाट करून दिली.
प्रभाग क्रमांक 20 मधून इच्छुक आणि तयारी केलेल्या दिव्या मराठे ओरडतच प्रचार कार्यालयात आल्या. मंत्री सावे यांना मला जाब विचारायचा आहे, असे सांगत 30 वर्षांपासून आपण पक्षात काम करत आहोत, असे असताना मंत्र्यांच्या जवळच्या एका व्यक्तीला तिकीट देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मला तयारी करायला सांगून ऐनवेळी तिकीट का नाकारले? माझ्यावर अन्याय का केला? बाहेरून आलेल्यांना पैसे घेऊन तिकीट देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
सुवर्णा बदाडे या इच्छुक महिलेने प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या पक्षातून आलेल्या उपऱ्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप केला. त्यांनी हमसून हमसून रडायला सुरवात केली. सावे, कराड बसलेल्या दालनात जाब विचारण्यासाठी जाण्याचा प्रयत्न केला असता महिला पोलिसांनी बदाडे यांना रोखले. भाजपच्या दुसऱ्या महिला पदाधिकारी व अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी उपमहापौर लता दलाल यांनी या महिलेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, बदाडे यांना भोवळ आली. त्यांना पाणी देऊन शांत करण्याचा प्रयत्न महिला पोलिस कर्मचारी करीत होत्या. बदाडे यांना धीर देताना ‘तुम्ही अर्ज भरा आणि माघार घेऊ नका, आपण यांना पाडू, ’ असे लता दलाल म्हणत होत्या. पण मी इथून हटणार नाही, आत्मदहन करेन, असे म्हणत बदाडे यांनी ठिय्या दिला. यानंतर त्यांना रिक्षात बसवून नेण्यात आले.
हा गदारोळ सुरू असतानाच श्रीअण्णा भंडारी हेही उमेदवारी दिली नाही म्हणून तेथे दाखल झाले. त्यांनी आरडाओरड करण्यास सुरवात केली. त्यांनी आपण इतकी वर्षे भाजपमध्ये काम करतो, पण अशी वागणूक मिळाली, असे सांगत पक्षासाठी आपण नोकरी सोडली आणि आज बाहेरून आलेल्यांसाठी पक्षाने आम्हालाच वाऱ्यावर सोडले, असा आरोप करीत मंत्री सावे, खासदार कराड यांच्या कक्षाकडे जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिस व इतर कार्यकर्त्यांनी भंडारी यांना अडवण्याचा प्रयत्न केला, यावेळी झालेल्या झटापटीत ‘व्हीआयपी’ कक्षाचे दार लाथ मारून तोडण्यात आले. लता दलालही संतापाने धगधगत होत्या. तिकीट वाटपात मोठा घोळ झाला आहे. जिथे खुला वॉर्ड आहे, तिथे ओबीसी महिलांना उमेदवारी असे प्रकार झाले आहेत. प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हा अन्याय आहे. तिकीट वाटपात मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण झाली आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.
कार्यकर्त्यांचा हा गोंधळ टिपेला पोचत असल्याने अतुल सावे आणि डॉ. भागवत कराड यांना मागच्या दाराने रवाना करण्यात आले. दुपारी दीडपर्यंत हा सारा गोंधळ सुरू होता. तेथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिव्या मराठे यांनी भाजपच्या प्रचार कार्यालयातच उपोषणाला सुरुवात केली. तर श्रीअण्णा भंडारी आणि त्यांच्या पत्नी श्रद्धा यांनी संतापाच्या भरात भाजप कार्यालय सोडले. लगोलग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना ‘एबी’ फॉर्म दिला. याच राड्याची बुधवारी पुनरावृत्ती पहायला मिळाली.
उपोषणकर्त्या महिलांनी भाजप शहराध्यक्षांना सुनावले. तर दिव्या मराठे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून शब्द देण्याची मागणी केली. अतुल सावे, भागवत कराड यांच्या गाडीसमोर इच्छुकांनी राडा घालत त्यांचे फोटो जाळले. त्यामुळे दोघांनीही काढता घेतला. पुन्हा प्रशांत मदाने पाटील नावाच्या कार्यकर्त्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. मला न्याय द्या अन्यथा आत्मदहन करणार, असा इशारा मदाने पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
सावेंनी आपल्या पीएला तर भागवत कराड यांनी सर्वेमध्ये दोन टक्के प्रतिसाद असलेल्या उमेदवाराला तिकिटे दिली. मी कोरोना काळात किट वाटले मांस वाटले, अनेक वर्षांपासून काम केले. पण यांनी जातीसाठी माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला डावल्याचा इच्छुक उमेदवाराने आरोप केला. उमेदवारी नाकारलेल्या मदाने पाटील यांनी सर्वेंचा दाखला देत आपली उमेदवारी कशी सशक्त होती हे सांगण्याचा प्रयत्न केला. खासदार भागवत कराड यांनी फक्त वंजारी लोकांना पुढे करून तिकिटे वाटली, असा आरोपही त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी केला.
ज्या पालेल नावाच्या व्यक्तीला तिकीट दिले त्याला आमच्या प्रभागात कोणीही ओळखत नाही. माझ्या नवऱ्याने पंधरा वर्षे घरदार सोडून पक्षासाठी काम केले आणि आम्हालाच उमेदवारी नाकारण्यात आली असा आरोप मदाने यांच्या पत्नीने केला. उमेदवारी तुम्हालाच आहे असे सांगून आमचा घात केला, आमच्या तोंडचा घास पळवला असा आरोपही महिला कार्यकर्त्यांनी यावेळी केला.
ज्यांना उमेदवारी दिली त्यांना आणि प्रभाग दोन मधून मला सर्वेमध्ये किती टक्के पसंती मिळाली हे भागवत कराड आणि अतुल सावे यांनी समोर येऊन दाखवावे. जर मी मागे असेल तर जिंदगीभर तुमची गुलामी करील, असे खुले आवाहन प्रशांत मदाने पाटील यांनी दिले. नाराजांनी आक्रोश करत भागवत कराड यांचा फोटो फाडला. सावे यांच्या गाडीला काळं फासलं. अखेर जमाव पांगवण्यासाठी आणि नाराजांना शांत करण्यासाठी आमदार संजय केणेकर यांनी धाव घेतली.
आंदोलकांनी आमदार संजय केणेकरांशीही वाद घातला. केणेकरांनी मदाने पाटील यांच्याशी चर्चा सुरू केली. तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही असा शब्द दिला. पण बदाने पाटील यांना भावना अनावर झाल्या आणि ते आमदार केनेकर यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडायला लागले. भाजप कोणाच्या बापाचा पक्ष नाही, असे म्हणत आंदोलकांनी घोषणा अधिक तीव्र केल्या. यानंतर केणेकर यांनी माध्यमांसमोर सुरु असलेला राडा पाहून आंदोलकांना तिथून दुसरीकडे घेऊन गेले.
नाशिकमध्येही महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपमध्ये बंडखोरीची धास्ती निर्माण झाली होती. ती टाळण्यासाठी परस्पर ‘एबी’ अर्ज देण्याचा प्रयोग अखेर भाजपच्या अंगलट आला. विल्होळी येथील एका फार्महाउसवर मंगळवारी तिकीट वाटप सुरू असल्याच्या चर्चेने शेकडो इच्छुक कार्यकर्ते तेथे धावले. मात्र वरिष्ठांकडून ठोस भूमिका न मांडल्याने संयमाचा बांध फुटला आणि परिसरात गोंधळ सुरू झाला.
तिकीट वाटपातील गोंधळामुळे घोषणाबाजी, प्रवेशद्वाराची तोडफोड, वाहनांचा पाठलाग असे प्रकारही घडले. शहराध्यक्ष सुनील केदार यांनी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच काढता पाय घेतला; मात्र इच्छुकांनी त्यांच्या वाहनांचा पाठलाग करून अडविल्याने ते पुन्हा घटनास्थळी परतले. तासभर चाललेल्या या गोंधळामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली तर शहरात अफवांचे पीक पसरले.
पक्षांतर्गत हाणामारी फार्महाउसमध्ये भाजपमधील गटबाजीचा वेगळाच ‘क्लायमॅक्स’ पाहायला मिळाला. सिडकोतील नुकत्याच प्रवेश केलेल्या एका नेत्याकडे चार ‘एबी’ अर्ज दिल्याने ज्येष्ठ नेते संतप्त झाले. शाब्दिक वादाचे रूपांतर झटापटीत झाले. दोन्ही गटांचे समर्थक एका खोलीत भिडल्याने तणाव वाढला; मात्र हा प्रकार बाहेर फारसा येऊ दिला गेला नाही. या साऱ्या प्रकरणाची चौकशी अंबड पोलिस ठाण्यात सायंकाळपर्यंत सुरू होती.
ठाण्यातही निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या तोंडावर उमेदवारीवरून भाजपात असंतोष उफाळून आला. पक्षाने जाहीर केलेल्या यादीतून अनेक माजी नगरसेवकांची नावे बाद केल्याने त्यांनी थेट भाजप कार्यालय गाठून गोंधळ केला. या वेळी कार्यालयात तोडफोडही करण्यात आली. पैसे घेऊन उमेदवारी विकल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला.
ठाण्याच्या वर्तकनगर येथील भाजपच्या कार्यालयामध्येही गर्दी उसळली होती. त्याचवेळी प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपचे माजी नगरसेवक राजकुमार यादव आणि वर्षा पाटील या दोघांची उमेदवारी कापण्यात आली. त्यांच्या जागी नव्याने पक्षप्रवेश केलेल्यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचा आरोप करीत इच्छुकांनी केला.
आमदार संजय केणेकर आणि निरंजन डावखरे यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत कार्यालयाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवारांना कोंडून ठेवण्याचाही प्रयत्न झाला. अडीच कोटी रुपये घेऊन उमेदवारी विकली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना बोलविण्यात आले.
याचप्रमाणे चंद्रपूर, पुणे, अकोला, मुंबई अशा विविध ठिकाणी उघडपणे निष्ठावंतांनी नाराजी, रोष व्यक्त केला. स्थानिक आजी, माजी आमदार, खासदार, मंत्री यांना जाब विचारण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालय, प्रचार कार्यालयाकडे धाव घेतली. त्यामुळे या सर्वांनी इच्छुकांना सामोरे न जाता घरी किंवा अन्य ठिकाणी राहणे पसंत केले. अनेकांनी पोलिसांकडे अतिरिक्त कुमक मागवून सुरक्षा वाढवून घेतली. यावर आता वरिष्ठ पातळीवर कसा आणि काय तोडगा निघतो हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.