Ajit Pawar : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी गणेशोत्सव, दसरा, दिवाळी असे मंत्रिमंडळ विस्ताराचे दिलेले मुहूर्त याआधीच हुकले आहेत. त्यामुळे आता हा विस्तार होणार नाही असे चित्र असताना हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आता येत्या काळात इच्छुक मंडळीकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केली जाण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु असल्या तरी विस्तार होत नसल्याने मंत्रिपदाची आस असलेल्या अनेकांची हिरमोड झाला होता. काही जणांनी तर आता विस्तार होणार नाही म्हणून मंत्रीपदाची आशा सोडली होती. भाजपनेही मंत्रिपद मिळेल याची अपेक्षा न ठेवता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश भाजपच्या सर्व आमदारांना दिले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुतीच्या नेत्यांना लवकरच मिळणार गिफ्ट
शुक्रवारी प्रसार माध्यमाशी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit Pawar ) यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले आहेत. त्यामुळे इच्छूक मंडळींच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात राज्यातील शिंदे-फडणवीस-अजित पवार महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना लवकरच गिफ्ट मिळणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
मकरंद पाटील यांचे मंत्रीपद फायनल
उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांच्या शेजारी साताऱ्याचे आमदार मकरंद पाटील बसले होते. त्यावेळी अजित पवार यांनी मकरंद पाटील लवकरच मंत्रिपदाची शपथ घेतील, असे सांगितले. त्यामुळे लवकरच त्यांना मंत्रीपदाचे गिफ्ट मिळू शकते. मकरंद पाटील (Makrand patil) हे साताऱ्यातील वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवेळी ते शरद पवारांसोबत दिसले होते. शरद पवारांच्या सातारा दौऱ्यात ते पवारांच्या गाडीतून प्रवास करताना दिसले. मात्र त्यानंतर ते अजित पवार यांच्या गटात दाखल झाले.
अजित पवार गटाच्या वाट्याला एक कॅबिनेट, दोन राज्यमंत्रिपद
येत्या काळात विस्तारात अजित पवार गटाला आणखी एक कॅबिनेट, दोन राज्यमंत्रिपद वाट्याला येण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
(Edited by Sachin Waghmare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.