
Mumbai News: महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी एकनाथ शिंदे गंभीरपणे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत होते. उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का, या प्रश्नावरही त्यांनी संध्याकाळपर्यंत निर्णय़ होईल, असे सांगितले. पण अजितदादांनी मात्र आपल्या पदाबाबतचा सस्पेन्स फोडला अन् गंभीर शिंदे खळखळून हसले.
भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर ते महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील, हे स्पष्ट झाले. त्यानंतर फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांसह महायुतीतील इतर नेत्यांनी राजभवनात जात राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. तिथेच या तिघांनीही पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.
देवेंद्र फणडवीस हे गुरूवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. पण त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री किंवा इतर कोणते मंत्री शपथ घेणार, याबाबत अद्यापही संभ्रम आहे. पत्रकार परिषेदेत याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आज सायंकाळी सर्व स्पष्ट होईल, हे फडणवीसांसह शिंदेंनीही सांगितले. शिंदे याबाबत बोलत असतानाच अजितदादांनी आपल्या उपमुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब केले.
संध्याकाळपर्यत त्यांचे समजेल. पण मी तर घेणार आहे, मी थांबणार नाही, असे अजितदादांनी म्हणतातच शिंदेंसह फडणवीस आणि इतर नेतेही खळखळून हसले. दादांनाही हसू आवरले नाही. त्यानंतर मग शिंदेंनाही राहावलं नाही.
दादांना तर सकाळी आणि संध्याकाळीही शपथ घेण्याचा अनुभव असे म्हणत शिंदेंनी त्यावर कडी केली. या जुगलबंदीत सगळेच नेते पोट धरून हसले. आम्ही दोघांनी पूर्वी सकाळी शपथ घेतली होती. ते राहून गेलं होतं. आता पुढे पाच वर्षे ठेवणार असल्याचे अजितदादा म्हणाले.
शिंदे मंत्रिमंडळात असणार की नाही, कोण मंत्री होणार, याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली नाही. याबाबत सायंकाळी माहिती दिली जाईल, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मात्र, शिंदेंच्या मंत्रिमंडळातील सहभागाबाबत वारंवार प्रश्न विचारल्यानंतर फडणवीस यांनी थोडी कळ काढा, सर्व संभ्रम दूर होईल, असे स्पष्ट केले. शिंदेंनी काही संभ्रम नसल्याचे सांगत उद्या शपथविधीला येण्याचे निमंत्रण देत पत्रकार परिषद संपवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.