District Court Bomb Threat : राज्यभरातील सत्र न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी : न्यायालयीन इमारती रिकाम्या, बॉम्बशोधक पथके तैनात अन् पोलिसांची धावपळ

Maharashtra Courts Receive Bomb Threat Emails : राज्यात एकीकडे दिवाळीची जय्यत तयारी केली जात असतानाच राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याचे धमकीचे ईमेल मिळाले
Bomb threat emails sent to district and sessions courts
Bomb threat emails sent to district and sessions courtsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Court News : महाराष्ट्रातील विविध जिल्हा व सत्र न्यायालयांना एकाच वेळी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. पुणे, ठाणे, सातारा, बीड, सोलापुरसह पंढरपूर, सांगली, हिंगोली, अहिल्यानगर, परभणी, नंदुरबार, धुळे, रत्नागिरी अशा एकूण 19 न्यायालयांना धमकीचे ई-मेल किंवा संदेश प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित न्यायालयांसह इतर न्यायालयांच्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत.

न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना तातडीने न्यायालयाबाहेर काढण्यात आले. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथके, श्वानपथके आणि स्थानिक पोलिसांकडून न्यायालय परिसराची कसून तपासणी सुरू करण्यात आली. या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ तणावाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

ठाणे जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी

ठाणे जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना सुरू केल्या. न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संपूर्ण इमारतीची तपासणी केली जात आहे. धमकीचा संदेश नेमका कोणी आणि कोणत्या माध्यमातून पाठवला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Bomb threat emails sent to district and sessions courts
Jalgaon Crime News : वाळू माफियांविरोधात साक्ष दिली, शेतकऱ्याचा काटा काढला, डंपरखाली चिरडून हत्या

सातारा न्यायालयाची इमारत रिकामी

सातारा जिल्हा न्यायालयालाही अज्ञात ई-मेल पत्त्यावरून बॉम्बसदृश वस्तू असल्याचा धमकीचा संदेश प्राप्त झाला. त्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाली करत सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण न्यायालयीन इमारत रिकामी केली. घटनास्थळी बॉम्ब शोधक व नाशक पथक, डॉग स्क्वॉड आणि क्यूआरटी पथक दाखल झाले. या पथकांकडून संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन दल आणि वैद्यकीय यंत्रणेलाही सज्ज ठेवण्यात आले आहे. आतापर्यंतच्या तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नसल्याची माहिती आहे. नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.

बीड आणि अहिल्यानगरमध्ये बॉम्बचा शोध

ठाणे आणि साताऱ्यानंतर बीड जिल्हा न्यायालयालाही अशाच प्रकारचा धमकीचा ई-मेल आल्याची माहिती समोर आली. ई-मेल प्राप्त होताच पोलिसांच्या पथकांनी न्यायालय परिसरात बॉम्बचा शोध घेण्यास सुरुवात केली. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून, सायबर पोलिसांकडून ई-मेलच्या स्रोताचा शोध घेतला जात आहे.

धमकीच्या संदेशात कितपत तथ्य आहे, याची पडताळणी सुरू असल्याचे बीड पोलिसांनी सांगितले. न्यायालयाचे कामकाज लवकरात लवकर पूर्ववत सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी शांतता राखावी आणि तपास सुरू असताना न्यायालय परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान अहिल्यानगर जिल्हा न्यायालयालाही ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. येथे तपासणी केली जात आहे.

सांगली आणि सोलापूर न्यायालयांतही तपासणी

सांगली जिल्हा न्यायालयालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाली असून, सोलापूर जिल्हा न्यायालयालाही असाच धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती आहे. तसेच पंढरपूर न्यायालयासही असाच धमकीचा संदेश आला आहे. यामुळे येथे एकच खळबळ उडाली असून ई-मेल मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी, वकील आणि नागरिकांना इमारतीबाहेर काढण्यात आले. बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, संपूर्ण इमारतीची तपासणी सुरू आहे. धमकीचा ई-मेल कोणी पाठवला आणि त्यामागे नेमका काय उद्देश आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

परभणी जिल्हा न्यायालयालाही धमकीचा ई-मेल

परभणी जिल्हा न्यायालयालाही धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. याची माहिती मिळताच परभणी पोलिसांनी न्यायालय परिसरात तपासणी सुरू केली. डॉग स्क्वॉड, बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि पोलिसांची विविध पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. न्यायालय परिसराची कसून झाडाझडती घेतली जात असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.

हिंगोलीत पोलीस यंत्रणा सतर्क

हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा संदेश मिळाल्याने पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली. हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक पथकाने तातडीने न्यायालयात धाव घेतली. न्यायाधीशांच्या दालनांसह संपूर्ण न्यायालयीन इमारतीची तपासणी करण्यात आली.

Bomb threat emails sent to district and sessions courts
Beed Crime News : मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या मुलावर गुन्हा दाखल : महिलेला घरात घुसून धमकी अन् विनयभंगाचा गुन्हा

धमकीमागे नेमकं कोण? पोलिसांकडून तपास सुरू

दरम्यान, सातही जिल्ह्यांतील न्यायालयांना मिळालेल्या धमकीच्या संदेशांमागे एकच व्यक्ती किंवा संघटना आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. धमकीचे ई-मेल कोठून पाठवण्यात आले, त्यामागे कोणाचा हात आहे आणि धमकीत कितपत तथ्य आहे, याचा तपास पोलीस आणि सायबर यंत्रणांकडून सुरू आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, तपास पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.