

पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन लवकरच सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सध्या हिंजवडी ते शिवाजी नगरपर्यंत प्रवास करण्यासाठी लागणारा 2 तासांचा वेळ अर्ध्या तासावर येणार आहे. रविवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी पुण्यातील मेट्रो मार्गिकेचा विस्तार करण्यासाठी 517 कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे.
शेतकऱ्यांनी जळगावमधील मुक्ताईनगरच्या L 53 महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले आहे. अंडर 5 या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारींचा पाढा वाचला त्यानंतर आता तक्रारी नको, कामाला लागा अशा सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेची मदत झाली नाही, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आजच्या बैठकीत खदखद व्यक्त केली आहे. महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मनसेला अनेक ठिकाणी मदत न केल्याची पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे
नाशिकच्या येवला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री छगन भुजबळ यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरील प्रश्नावर बोलताना त्यांनी म्हटले की, दोन्ही ठाकरे बंधू जसे एकत्र आले तसे पवार एकत्र यावे असं वाटत आहे. परंतु अशा काही चर्चा झाल्या का याबाबत माहिती नाही. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले की माझ्याशी कधीही अजित पवार त्याबाबत कधीही बोलले नाहीत. जे काही करायचे ते आम्हाला बीजेपी सोबत राहून करायचे आहे. असं काही करायचे असले तर त्याबाबत आम्हाला भाजपला विचारावे लागेल. कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही घ्यायचे याबाबत भाजपच्या काही ज्येष्ठ मंडळींना विचारावं लागेल. कारण काय बोलणं झालं होतं हे माझ्यासहीत कोणालाही माहीत नाही.
कात्रज दूध संघाच्या इतिहासात महत्त्वाचा बदल झाला आहे. संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दूध संघाला ‘अजितदादा पवार दूध संघ’ असे नाव देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे संघाला नवी ओळख मिळणार असून सहकार क्षेत्रातील योगदानाचा सन्मान व्यक्त केला जाणार आहे. लवकरच हे नाव अधिकृतपणे वापरात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी रवी लांडगे यांची निवड झाली आहे. रवी लांडगे हे सलग दोन वेळा बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले असून आता त्यांच्यावर महापौरपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर उपमहापौरपदी विजय शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
चंद्रपूर महापालिकेतील भाजपचे 24 नगर सेवक आपला गट स्थापन करण्यासाठी नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहचले. भाजप आज आपला गट स्थापन करून गटनेत्याची नोंद करणार आहे. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा दोन गटात अंतर्गत वाद सुरू आहे. मात्र, भाजप आज आपल्या वाद थांबवत गटाची नोंदणी करून गटनेता नोंदणी करणार आहे.
Parbhani ZP News : परभणी महापालिकेतील गटनेते पदावरून भाजपमध्ये असलेली अंतर्गत धुसफूस सुरूच असताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी झरी येथील आपल्या प्रचारसभेतून पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांना चांगलाच दम भरला आहे. निवडणुकीत पक्षात राहूनच पक्षाच्या उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूवर गंभीर शंका उपस्थित केली आहे. हवामान चांगले असतानाही विमान कसे कलंडले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. अपघाताच्या चौकशीतून सत्य समोर येईल असे सांगत, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत दहा दिवसांनी मोठे खुलासे करणार असल्याचेही देशमुख यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विदीप जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगाव येथे विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला पोहोचल्या आहेत.
मुंबईतील मुलं बेपत्ता प्रकरणावरुन संजय राऊत यांनी सरकारला निशाण्यावर घेतलं आहे. रोहित शेट्टीच्या घरावरील हल्ला करणाऱ्यांना 24 तासांत पकडलं जात असेल तर सामान्यांच्या घरातील मुली बेपत्ता होत असतील तर ही जबाबदारी कुणाची? असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला आहे.
जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये विक्रमी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 9 हजार 800 रुपये तर, चांदीच्या दरात तब्बल 53 हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 53 हजार 470 रुपये तर, चांदीचे दर 2 लाख 57 हजार 500 रुपयांवर आले आहेत. दोन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचलेले सोन्याचे दर पुन्हा दीड लाखावर तर चार लाखांचा आकडा पार करणाऱ्या चांदीचे दर देखील अडीच लाखांवर आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
अजितदादांची दोन्ही राष्ट्रवादी एक व्हावी अशी इच्छा होती का? या वर उत्तर देताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, "अजितदादांनी जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये मी वक्तव्य ऐकलं. पंरतु आम्हा राष्ट्रवादीच्या काही नेतेमंडळींना घेऊन अशा चर्चा कधी झालेल्या नाहीत. अनेक ठिकाणी दादांनी चिन्ह एक केलं, ज्याला तुतारीवर लढायचचं त्यांनी त्यावर लढा अन् ज्यांना घड्याळ चिन्हावर लढायचं त्यावर लढा असं सांगितलं होतं. अनेक ठिकाणी दादांनी सांगितलं तसं लढलो, मात्र दादांनंतर आता अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत."
सुप्रिया सुळे यांनी एक नवीन व्हॉट्सअप स्टेट्स ठेवले. ज्यामध्ये त्यांनी अजित पवार यांच्यासोबतचा जुना फोटो शेअर केला. या फोटोमध्ये सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्यासोबत दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना सुप्रिया सुळे यांनी खास कॅप्शनही दिले. सुप्रिया सुळे यांनी @ बारामती…… असे कॅप्शन दिले आहे. या व्हॉट्सअप स्टेट्सच्या माध्यमातून काहीतरी मोठे संकेत देताना सुप्रिया सुळे या दिसत आहेत.
अजित पवारांच्या पक्षाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफांनी मोठा दावा केला आहे. 'दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणासाठी जयंत पाटील माझ्यासाठी बोलले होते. पण आम्हाला घेऊन कोणत्याही बैठका झाल्या नसल्याचं हसन मुश्रीफांनी म्हटलं आहे.
'अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर स्वरूपाचे आहेत', अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. जर विमानातून सहा जण प्रवास करत होते तर, पाच मृतदेह कसे काय मिळाले? मग सहावी व्यक्ती कोण होती? त्याची बॉडी का मिळाली नाही? असेही गंभीर प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले आहे.
'आमचा सुफडा साफ करणाऱ्यांच्या पेक्षा 'AIMIM'ची लायकी जास्त आहे. सोलापूर महापालिकेत काँग्रेसला दोन जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खातेही उघडता आले नाही. तर 'AIMIM'यांच्या पेक्षा मोठा पक्ष ठरला. 'AIMIM'ची लायकी यांच्यापेक्षा जास्त आहे. भाजपला संपवणारे अजून जन्माला यायचे आहे,' अशी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मुंबईतील 29 नगरसेवकांची आज गट नोंदणी केली जाणार आहे. तत्पूर्वी शिंदेसेनेकडून मुंबई महापालिकेतील गटनेते पदासाठी अमेय घोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.
अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात झाला तेव्हा सुरक्षारक्षक विदीप जाधव हे त्यांच्यासोबत विमानात होते. विमान कोसळल्यानंतर विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला होता. विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सांत्वनपर भेट घेणार आहे.
Mumbai live :मुंबईचा महापौर आज ठरणार
मुंबईचा महापौर कोण होणार यासाठी हालचालींना वेग आला आहे. महापालिकेच्या सत्ता स्थापनेचे सूत्र आज ठरणार. आहेत. महायुती दोन गटात नगरसेवकांची नोंदणी करणार आहे. भाजपचा एक गट तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र नोंदणी करणार आहेत.
उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच आज दौऱ्यासाठी बाहेर पडणार आहेत. आज (2 फेब्रुवारी) सुनेत्रा पवार या कराड आणि फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 11 वाजता सुनेत्रा पवार या कराड येथील प्रितीसंगम बाग येथे जातील. त्यानंतर सुनेत्रा पवार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पमाला अर्पण करून त्यांना आदरांजली वाहतील. फलटणमध्ये विदीप जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.