

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून, उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त होत असतानाच बीडमध्ये मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहेत. सरकारच्या निषेधार्थ बीडच्या पाडळसिंगी टोलनाक्यासमोर मराठा समाज बांधवांनी टायर जाळून आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या भूमिकेचा निषेध केला.
रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. रोहा शहराचे माजी नगराध्यक्ष आणि सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय असलेले संतोष पोटफोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पालकमंत्री भरत गोगावले आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
वैद्यकीय क्षेत्रात नाव असलेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डॉ अमोल अन्नदाते यांनी आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, अशी राज्याची अपेक्षा होती. पण ते सुनेत्राताईंच्या माध्यमातून पूर्ण व्हावे, यासाठी आम्ही कष्ट करत राहणार आहोत. एका मुलाने आईचे हात बळकट करण्यासाठी केलेला हा प्रवेश आहे. तुमचं काम चांगलं असेल तर तुमचा पक्षाकडून विचार होतो, असे डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितले.
राज्य लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटीप्रकरणी पोलिसांनी ऋतुजा पाटील यांना ताब्यात घेतले आहे. एमपीएससी पेपर फुटीप्रकरणी गौरव पाटील आणि ऋतुजा पाटील यांच्यामध्ये चॅट झाले होते, ते व्हायरल झाले होते, त्यामुळेच पेपरफुटीचा प्रकार बाहेर आला. दोघांमध्ये झालेल्या ब्रेकअपनंतर गौरव पाटील यांनी ते चॅट व्हायरल केले होते. काही दिवसांपूर्वी ऋतुजा पाटील हिच्या वडिलांनाही पोलिसांनी अटक केली होती. आता तिलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे रमेश केरे पाटील यांना मंत्रालयात आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून विखे पाटील, प्रसाद लाड हे मराठा समाजाची फसवणूक करत आहेत. मराठा समाजाने किती आंदोलन करायची आणि किती गुन्हे अंगावर घ्यायचे. मराठा आरक्षणाच्या मुद्दावर हे सरकार असफल झाले आहे. कुणबी नोंदी आहेत, त्यांना कुणबी मराठा सर्टिफिकेट मिळणार आहे. बाकीच्या मराठ्यांचे काय. माझी कुणबी नोंद नाही, त्यामुळे मी काय करायचं, असा सवाल रमेश केरे पाटील यांनी केला.
पुणे जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी 5704.50 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला राज्य सरकारने मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली. त्यामुळे कुकडी खोऱ्यात 1,44,912 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले आहे. सुप्रीम कोर्टात बुधवारपासून शिवसेना प्रकरणाची सुनावणी पुन्हा सुरू होणार आहे. बुधवारपासून शिंदेंच्या बाजूने युक्तिवाद केला जाणार आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी तसेच विविध राज्यांतील नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
सुट्टे तेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलासा दिला. पुढील वर्षभर सुट्टे तेल विक्री करण्यास सुट देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर सुट मिळणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
समृद्धी महामार्गावरील वैजापूरजवळील दरोडा प्रकरणात वैजापूर पोलीस ठाण्याचे सुनील खरात आणि विरगाव पोलीस ठाण्याचे गुणवंत थोरात यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
दिल्लीत ५ सप्टेंबर रोजी होणारा CJP मोर्चा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने कोर्टात स्पष्टता दिल्याने CJP ने हा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत पुन्हा एकदा राजकीय वादाला तोंड फुटले आहे. वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीदरम्यान शिवसेनेचे नेते शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदिल फरास यांच्यात जोरदार वादावादी झाल्याची माहिती समोर आली आहे. या वादादरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगण्यात येत आहे.
बैठकीदरम्यान नेमक्या कोणत्या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरू झाला, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, वाद वाढत गेल्याने बैठकीच्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.या घटनेनंतर दोन्ही गटांचे समर्थकही महापालिका चौकात जमा झाले. त्यामुळे परिस्थिती अधिक संवेदनशील बनली असून, महानगरपालिका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दोन पदाधिकाऱ्यांना अटक झाल्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांनी चतुश्रृंगी पोलीस स्टेशनला गर्दी केली आहे. पॉलिटेक्निकल कॉलेज मधील नरेंद्र मोदी यांचा फोटो काढल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला. आहे.
लातूर जिल्ह्यात आजपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईला करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
पुणेकरांचाही प्रवास आजपासून महागलाय. आजपासून पुण्यात रिक्षाच्या प्रवास दरात वाढ कतरण्यात आलीय. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ही दरवाढ झालीय. नवीन दरानुसार किमान भाडं 25 रुपयांवरून 30 रुपये करण्यात आलंय. तर प्रवासासाठी प्रति किलोमीटर 17 रुपयांऐवजी 20 रुपये आकारले जाणार आहेत. त्यामुळे दररोज रिक्षानं प्रवास करणाऱ्या पुणेकरांच्या खिशावर अतिरिक्त भार पडलीय.
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज कॅबिनेट बैठक आहे मात्र, या बैठकीत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र, अनुपस्थितीत राहतील.
मुंबईकरांना महागाईचा जोरदार फटका बसलाय... CNG-PNGच्या दरात वाढ झालीय. आजपासून हे दर लागू झालेत... एवढंच नाही तर ऑटो-टॅक्सीनं प्रवास करणाऱ्यांनाही फटका बसलाय... दूध दरही 1, 2 रुपयांनी नाही तर तब्बल 9 रुपयांनी वाढलेत. त्यामुळे महागाईच्या या माऱ्यामध्ये जगायचं कसं असा सवाल मुंबईकर करतायत.
जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे... त्यांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथक आलं होतं.. मात्र जरांगेंनी त्यांना तपासणी करण्यास नकार दिला आहे...
रिझर्व बँकेने जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 50 हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसे आदेश जारी करण्यात आले आहे. क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना माहिती देण्यात त्रुटी तसेच या कंपन्यांमधील सदस्यत्व आणि केवायसी संदर्भातील रिझर्व बँकेच्या काही निर्देशांचे पालन बँकेकडून झाले नसल्याचे तपासणीत आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
केंद्रातील मोदी सरकारची क्रिमीलेअर आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसीविरोधी मानसिकता पुन्हा एकदा समोर आली. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश देऊनही अंमलबजावणीऐवजी सरकार न्यायालयात पुनर्याचिका दाखल करत आहे. यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) उत्तीर्ण सुमारे 980ओबीसी विद्यार्थ्यांचे आयएएस व आयपीएस होण्याचे स्वप्न धोक्यात आले आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.
हिंगोलीच्या एका विद्यार्थ्याचा जापानमध्ये स्विमिंग पूलमध्ये पोहताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्याम संतोष अग्रवाल (वय 25) असे या युवकाचे नाव असून, तो आयआयटी खरगपूर येथे मास्टर ऑफ आर्किटेक्ट या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होता. आयआयटी एक्सचेंज कार्यक्रमामध्ये त्याची महाविद्यालयाकडूनच सहा महिन्याच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. त्यानुसार तो मागील महिन्यात जापान मधील हिरोशीमा विद्यापीठामध्ये पोहोचला होता. दरम्यान जापानच्या कुरे शहरातील कारूगा बीटपार्क येथे पोहण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये श्याम उतरला होता.
वर्ल्ड असोसिएशन ऑफ हिंदू ॲकेडेमिशियन्स (वाहा) तर्फे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात नियोजित कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला आहे. पुरोगामी विद्यार्थी कृती समितीने कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांना निवेदन देत कार्यक्रमाला विरोध दर्शविला आहे. विद्यापीठाने या संपूर्ण प्रकरणात सावध भूमिका घेताना, अद्याप अंतिम परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
लातूर जिल्हा पोलिस दलाच्यावतीने जिल्ह्यात आजपासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्तीची करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग यावर विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आता या महामार्गावर दुचाकीस्वारांना हेल्मेटचा वापर करावा लागणार आहे.
नाशिक परिक्रमा मार्ग (बाह्य रिंग रोड) प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बुधवारी (ता.2) मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या बैठकीस २१ शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर यावेळी अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे.
चालकाला डुलकी लागल्याने गुजरात राज्य परिवहन महामंडळाची बस रस्त्यालगतच्या खड्ड्यात गेल्याची घटना अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे परिसरात शिर्डी-नाशिक महामार्गावर घडली. या घटनेत तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले.
आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते आदिवासी आंदोलकांची भेट घेणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधी यांच्या पाठिंब्याने या आंदोलकांमध्ये जोश निर्माण झाला आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना प्रशासनाने मनोज जरंगे पाटील यांना आश्वासन दिले होते. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. त्यात राज्य सरकारचे अधिकारी आघाडीवर होते. या अधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांना कोणती आश्वासने दिली? हे जाहीर करावे. आता पुन्हा एकदा जरांगे यांना आंदोलनाची घोषणा करावी लागली. याचा अर्थ त्यांना देण्यात आलेली आश्वासने सरकारने पाळलेली नाहीत. आश्वासने पूर्ण झाली नसल्यानेच आंदोलनाची घोषणा झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून नक्कीच जरांगे पाटील यांची दिशाभूल करण्यात आली, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
आजपासून पुण्यात रिक्षाची भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या खिशाला झळ बसणार आहे. आता पुण्यात एका किलोमीटरच्या प्रवासासाठी २० रूपये मोजावे लागणार आहेत.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनिमित्ताने जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप यादीवर हरकतीचा निकाल काल देण्यात आला. जवळपास 789 संस्था अपात्र केल्यानंतर सत्ताधारी माजी संचालकांसह ठराव धारकांचा संताप अनावर झाला. यातूनच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांकडून थेट अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ आणि धमकी देण्यात आली.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज दौंड तालुक्यातील पाटस इथून मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन जाणार आहेत. मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. राज्यभरातील ओबीसींना पाटसमध्ये येण्याच आवाहन हाके यांनी केलेलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाचा आज चौथा दिवस असून आता केवळ चर्चा नको, तर मागण्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. तर त्यांनी आंदोलकांना १२ तारखेपर्यंत हळूहळू मुंबईच्या दिशेने जाण्याचं आवाहनही केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.