Maharashtra Live Political Update : अमोल कोल्हे आणि छगन भुजबळ यांच्यात माळशेज घाटात रिसॅार्टमध्ये गोपनीय चर्चा

Political Breaking Live Headlines Updates : ज्येष्ठ नेते ष शरद पवार उपचारानंतर पुन्हा एकदा राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय होणार आहेत. आज ते पुणे जिल्ह्यातील कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत, पुण्यातील लक्ष्मी रोडवरील कारवाई विरोधात व्यापारी आक्रमक यासह विविध राजकीय घडामोडी पाहूया.
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

NCP Politics : अमोल कोल्हे आणि छगन भुजबळ यांच्यात माळशेज घाटात रिसॅार्टमध्ये गोपनीय चर्चा

पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील ओतूरमध्ये राज्यव्यापी सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनासाठी राजकीय नेत्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरत असतानाच, अधिवेशनाला येण्यापूर्वी खासदार अमोल कोल्हे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात माळशेज घाटातील एका रिसॉर्टमध्ये गोपनीय चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा थांबलेली असताना या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या चर्चेत नेमके कोणते विषय झाले आणि त्याचा राष्ट्रवादीच्या राजकीय समीकरणांवर काही परिणाम होणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Maharashtra Politics : मंत्री भुजबळ, खासदार कोल्हे आणि थोरात एकाच मंचावर आले एकत्र

महाराष्ट्र राज्यव्यापी विशेष सत्यशोधक अधिवेशनात अजित पवार राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात मंचावर उपस्थिती लावली आहे. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील ओतूरमध्ये हे अधिवेशन पार पडत आहे. इन्फेक्शन होऊ नये म्हणून गर्दीत न येण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने या अधिवेशनाला शरद पवार अनुपस्थित राहू शकले नाही. विलीनीकरण चर्चा सुरू असताना दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एका मंचावर येत असल्याने काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Buldhana Crime : मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणारा 50 लाखांचा विमल गुटखा पकडला; दोन बोलेरो पिकअप पोलिसांच्या ताब्यात..

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात अवैध गुटखा वाहतुकीविरोधात जलंब पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरित्या विमल गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन बोलेरो पिकअप वाहनांना माटरगावजवळ पकडण्यात आले. या कारवाईत अंदाजे 50 लाख रुपये किमतीचा विमल गुटखा जप्त करण्यात आला आहे. अमरावती येथील विशेष पोलीस महानिरीक्षक पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जलंब पोलिसांनी नाकाबंदी करून ही कारवाई केली. दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात आणण्यात आली असून याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahilyanagar Crime : प्रांताधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या टोळीविरुद्ध 'मकोका'ची कारवाई

बेकायदेशीर मुरूम वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करताना, राहुरीचे उपविभागीय महसूल अधिकारी विनीत शिर्के यांच्या अंगावर डंपर घालून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीविरोधात संघटित गुन्हेगारीच्या कलम 111 कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. अतिरीक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी ही माहिती दिली. या कलमान्वये मकोका कायद्याप्रमाणए शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे.

Buldhana News : खामगाव आणि शेगाव रुग्णालयांतील सिटीस्कॅन सेवा तीन महिन्यांपासून ठप्प; रुग्णांची फरफट...

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव उपजिल्हा रुग्णालय आणि शेगाव येथील रुग्णालयातील सिटीस्कॅन सेवा मागील तीन महिन्यांपासून बंद पडली आहे. 28 जुलैपासून खामगाव येथील सिटीस्कॅन मशीन बंद असल्याने खामगाव व शेगावसह परिसरातील सर्वसामान्य गरजू रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. ही सेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. घाटाखालील प्रमुख तालुका असलेल्या खामगावमध्ये उपचारासाठी मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होतात. या रुग्णालयात दररोज साधारण 30 ते 40 रुग्णांचे सिटीस्कॅन केले जात होते. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून ही सुविधा बंद असल्याने रुग्णांना खाजगी केंद्रांकडे धाव घ्यावी लागत आहे. आर्थिक ऐपत नसलेल्या रुग्णांना अकोला येथे पाठवले जात आहे. परंतु तेथेही सिटीस्कॅनसाठी एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागत असल्याने उपचारात दिरंगाई होऊन रुग्णांच्या जीवावर बेतू शकते, अशी चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे अडचणी दूर करून तातडीने सिटीस्कॅन सेवा सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

Ahilyanagar News : निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन, अहिल्यानगरमधील दुष्काळी भागाला दिलासा

तब्बल पन्नास वर्षे वाट पाहिल्यानंतर उत्तरनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे पूर्ण झाली आणि आज दुष्काळी परिस्थितीत शेतकरी तसेच सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला. निळवंडे धरणातून प्रवरा नदी पात्रात सध्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. नदी बरोबरच धरणाच्या कालव्यांमधून देखील हे आवर्तन सुरू झाल्याने दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळाला आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याने सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन हे आवर्तन सोडण्यात आल आहे. या आवर्तनामुळे संगमनेर तालुक्यासह उत्तरनगर जिल्ह्याच्या विविध गावातील साठवण तलाव भरले जाणार आहेत. त्यामुळे दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळाला आहे. पुढचे दोन महिने तरी पिण्याच्या पाण्याचे संकट दूर झाल्याची भावना व्यक्त करत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

Nandurbar News : नंदुरबार बाजार समितीत लाल अन् पांढऱ्या मक्याची आवक वाढली; प्रतिक्विंटल 2 हजार 400 ते 3 हजार रुपयांपर्यंत चांगला दर...

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या लाल आणि पांढऱ्या मक्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारपेठेत मक्याला प्रतिक्विंटल 2 हजार 400 ते 3 हजार रुपयांपर्यंत चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे जिल्ह्यासह विविध भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने आपला शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन येत आहेत. दररोज होणाऱ्या या मोठ्या आवकीमुळे बाजार समितीतील आर्थिक उलाढाल लक्षणीयरीत्या वाढली असून, बाजारपेठेत मोठी लगबग पाहायला मिळत आहे.

सहकार संस्थांच्या निवडणुका होणार 

दुष्काळी परिस्थितीचा विचार करून राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर आहेत, त्याच टप्प्यावर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या आदेशात अंशतः सुधारणा करत सरकारने काही संस्थांना निवडणूक प्रक्रिया राबविण्याची मुभा दिली आहे.

भाजपकडून मंत्र्यांची झाडाझडती

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर भाजपकडून मंत्र्यांच्या कामगिरीची झाडाझडती सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची कानउघाडणी केल्याची चर्चा आहे. मंत्री म्हणून पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांसाठी नेमके काय केले, याचा लेखाजोखा मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील सात दिवसांत कामाचा अहवाल सादर करून बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश पक्ष नेतृत्वाने दिले आहेत.

पोलिस आयुक्तांना प्रमोशन, डुंबरे, भारती झाले DGP

मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना पोलीस महासंचालक म्हणजेच डीजीपी श्रेणीत बढती मिळाली आहे. विशेष म्हणजे शासनाने त्यांना इन-सिटू प्रमोशन दिले आहे. त्यामुळे बदली न होता हे दोन्ही अधिकारी अनुक्रमे मुंबई आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणूनच आपला कार्यभार पुढे सुरू ठेवतील.

मुळशी धरणातील पाणी पुण्याला

पुणे वाढणारी शहराची हद्द आणि लोकसंख्या यामुळे भविष्यात उद्भवू शकणारी पाणीटंचाई लक्षात घेता पुणेकरांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे शहरासाठी मुळशी धरणातून ८ टीएमसी पाणी कोटा मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन पुढील दीड ते दोन वर्षांमध्ये हे अतिरिक्त पाणी पुणे शहरासाठी उपलब्ध होणार आहे.

लक्ष्मी रस्त्यावरील कारवाई विरोधात व्यापारी आक्रमक, तीव्र आंदोलनाचा इशारा

लक्ष्मी रस्त्यावरील दुकानांचे नामफलक विनापूर्वसूचना तोडल्याच्या महापालिकेच्या कारवाईचा पुणे व्यापारी महासंघाने निषेध केला आहे. ही कारवाई तातडीने थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळिया यांनी दिला.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी (ता. २०) लक्ष्मी रस्त्यावरील दुकानांचे नामफलक सरसकट काढण्यास सुरुवात केली. कोणतीही पूर्वसूचना न देता झालेल्या या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली. नामफलक लावण्याची कायद्यात तरतूद असताना प्रशासनाने दडपशाहीने ते तोडले. त्यामुळे रस्त्याचे विद्रूपीकरण झाले असून, तोडलेले पत्रे आणि अन्य साहित्य फुटपाथवरच टाकून देण्यात आले. व्यापारी महासंघाने हरकत घेतल्यानंतर ही कारवाई थांबविण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.