

Deworming Day October 27: राज्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रात २७ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबवण्यात येणार आहे.
या दिवशी जंतनाशक गोळ्या घेण्यापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ३ नोव्हेंबर रोजी पुन्हा संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षण विभागाने २२ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन परिपत्रक जारी करून विविध सूचना दिल्या आहेत.
या मोहिमेअंतर्गत अंगणवाड्यांमधील बालकांपासून शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि वरिष्ठ महाविद्यालयांच्या प्रथम वर्षातील पात्र विद्यार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्याचे नियोजन आहे. शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित खासगी शाळांसह आश्रमशाळा, नगरपालिका-महानगरपालिका शाळा, सीबीएसई शाळा, नवोदय विद्यालये, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, मदरसे आणि गुरुकुलांचाही यात समावेश आहे.
याशिवाय नर्सिंग, आयटीआय, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी, कला, वाणिज्य, विज्ञान, फार्मसी आणि डी.एड. महाविद्यालयांतील प्रथम वर्षाच्या पात्र विद्यार्थ्यांनाही मोहिमेचा लाभ मिळणार आहे.
राष्ट्रीय जंतनाशक दिनी म्हणजेच २७ ऑक्टोबरला संबंधित शैक्षणिक संस्था आणि अंगणवाड्यांमध्ये पात्र मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या दिल्या जातील. या दिवशी गैरहजर राहिलेल्या किंवा गोळ्या घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ३ नोव्हेंबरला मॉप-अप दिन आयोजित केला आहे. त्यामुळे कोणताही पात्र विद्यार्थी या मोहिमेपासून वंचित राहू नये, यासाठी शाळा, संस्थांनी आवश्यक नियोजन करणे अपेक्षित आहे.
राज्यात २०१४-१५ पासून राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेचा मुख्य उद्देश आतड्यांतील जंतांचा प्रादुर्भाव कमी करणे हा आहे. त्यातून मुलांमधील रक्तक्षय आणि कुपोषण कमी करण्यास मदत होऊ शकते. तसेच पोषणस्थिती सुधारून शारीरिक आणि बौद्धिक विकासाला चालना देणे, हा या उपक्रमामागील हेतू आहे.
मोहिमेसाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या सार्वजनिक आरोग्य विभागाला कळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार गोळ्यांचा पुरेसा साठा उपलब्ध होण्यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे. शाळांचे नोडल शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी आणि पर्यवेक्षक यांच्यासाठी आरोग्य विभाग प्रशिक्षण आयोजित करणार आहे.
राष्ट्रीय जंतनाशक दिन आणि मॉप-अप दिनादरम्यान अधिकाऱ्यांनी क्षेत्रभेटी देऊन अंमलबजावणीची पाहणी करावी आणि त्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे सादर करावा, असेही निर्देश आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समन्वय समित्यांमार्फत विविध विभागांमध्ये समन्वय साधला जाणार आहे.
एखादा विद्यार्थी आजारी असल्यास किंवा औषध देताना विशेष काळजी आवश्यक असल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांचा सल्ला घ्यावा. गोळी घेतल्यानंतर प्रतिकूल लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहेत. तसेच जनजागृती साहित्य शाळा, अंगणवाड्या आणि गावातील सहज दिसणाऱ्या ठिकाणी लावण्यास सांगण्यात आले आहे.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर समन्वय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्था आणि आरोग्य विभागाच्या समन्वयातून पात्र विद्यार्थ्यांपर्यंत या उपक्रमाचा लाभ पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.