SSC Exam Result : इतरांना मराठी शिकवायला निघालेल्या महाराष्ट्र सरकारला धक्का : दहावीच्या 94 हजार विद्यार्थ्यांनी 'मराठी धोरणाची' लाज काढली

SSC Exam Result : महाराष्ट्र दहावी परीक्षेत मराठी विषयात एकूण 94 हजार 544 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. पहिली भाषा म्हणून मराठी निवडलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल 92.57 टक्के तर दुसऱ्या भाषेचा निकाल 96.68 टक्के लागला आहे.
Over 94 thousand students failed in Marathi subject in Maharashtra SSC Exam 2026.
Over 94 thousand students failed in Marathi subject in Maharashtra SSC Exam 2026.Sarkarnama
Published on
Updated on

एकीकडे महाराष्ट्र सरकार मुंबईत राहणाऱ्या अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आधी ज्या रिक्षा चालकांना मराठी बोलता येत नसेल त्यांचा परवानाच निलंबित करण्याची तंबी देण्यात आली. यावर वादंग झाल्यानंतर या सर्वांना मराठी शिकवणार अशी भूमिका घेतली. पण याच सरकारचा दिव्याखाली अंधार असा कारभार पाहायला मिळत आहे.

दहावीच्या निकालातील मराठी विषयाच्या निकालाची आकडेवारी केवळ चिंताजनक नाही; तर मराठी वाचवण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षावर नव्याने चिंतन करायला भाग पाडणारी आहे. यंदा पहिली भाषा म्हणून मराठीची निवड केलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल आठ टक्के, तर दुसरी भाषा म्हणून निवडलेल्या विद्यार्थ्यांपैकी साडेतीन टक्के विद्यार्थी मराठी भाषा विषयात नापास झाले आहेत.

Over 94 thousand students failed in Marathi subject in Maharashtra SSC Exam 2026.
SSC marksheet symbols : गुणपत्रिकेतील ‘सीक्रेट कोड’चा गोंधळ! सोशल मीडियावर व्हायरल पोस्टरनंतर बोर्ड मैदानात

ज्या भाषेचं बाळकडू घरातून मिळतं, ज्या भाषेत आपण विचार करतो, स्वप्न पाहतो त्याच मातृभाषेत उत्तीर्ण होण्यापुरते गुणही काही हजार मुलांना मिळवता येऊ नयेत, हे गंभीर आणि भयावह आहे. विद्यालयीन भाषिक शिक्षणाचा दर्जा, हे यामागचं एक मोठं कारण. मराठीच्या शिक्षकांनाच हल्ली कर्ता-कर्म-क्रियापदाचे नियम माहिती नसतात.

‘आरती प्रभू या स्त्री साहित्यिक का’, असं विचारणाऱ्या शिक्षकांचे नमुने अनेकांनी पाहिले आहेत. पाठ्यपुस्तकांपलीकडे जाऊन भाषेच्या प्रेमाने जीव ओतून शिकवणारे शिक्षक आज बोटावर मोजण्याइतके सापडतील. शिक्षकांचं हे भाषिक औदासीन्य विद्यार्थ्यांमध्ये झिरपलं नाही, तरच नवल!

मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकांचा खालावलेल्या दर्जाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. एकेकाळी पाठ्यपुस्तकातील धडा आवडला म्हणून त्या लेखकाचं पुस्तक शोधून ते वाचणारी पिढी होती. परंतु केवळ आपल्या हितसंबंधांसाठी म्हणून दर्जाहीन साहित्याचा समावेश पाठ्यपुस्तकात करणं, हे किती महागात पडू शकतं, याची प्रचिती आता येत असावी.

बर्गर-पिझ्झा ते नूडल्स अन् सुशी अशा खाद्यपदार्थांवर पोट भरणाऱ्या, कॅफे अन् पबमध्ये ‘हँगआऊट’ करणाऱ्या आजच्या पिढीच्या दैनंदिन व्यवहारातून मराठीचं स्थान दिवसेंदिवस आक्रसतं आहे, हे नक्की. याच वातावरणात घडलेले पालकही आपल्या मुलांशी घरात कोणत्या भाषेत संवाद साधतात, हेही पाहायला हवं. या कल्लोळात मोबाईलवर टाइप होणारी ‘मिंग्लिश’ आणि पुस्तकातील प्रमाण भाषेचं व्याकरण, यातली दरी प्रचंड रुंदावते आहे.

Over 94 thousand students failed in Marathi subject in Maharashtra SSC Exam 2026.
SSC Result 2026 : दहावीचा निकाल जाहीर, राज्यातील 92.09 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; 'या' अधिकृत वेबसाईटवर चेक करा तुमचा स्कोअरकार्ड!

मराठीच्या संवर्धनासाठी आज संस्थात्मक आणि सरकारी पातळीवर सुरू असलेले प्रयत्नही अपवाद वगळता दिशाहीन आहेत. मराठीला रोजगाराची आणि ज्ञाननिर्मितीची भाषा करण्याच्या प्रयत्नांना आधीच उशीर झाला आहे. त्याचा वेग वाढवला नाही; तर हा निकाल मराठीचाच ‘निकाल’ लावण्याच्या दिशेने जाणारं घातक वळण ठरेल. हाच कदाचित या निकालाचा सांगावा आहे.

मराठीत ९४ हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण :

दहावीत यंदा १५ लाख ४२ हजार ४७२ पैकी १० लाख ८७ हजार ६९९ विद्यार्थ्यांनी पहिली भाषा म्हणून मराठीचा पर्याय निवडला हाेता. त्यापैकी १० लाख ०६ हजार ८९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याची सरासरी टक्केवारी ९२.५७ टक्के इतकी आहे.

दुसरी भाषा म्हणून मराठीची निवड केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४ लाख १५ हजार ४७३ हाेती. त्यातील ४ लाख १३ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४ लाख १७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याची टक्केवारी ९६.६८ इतकी आहे.

मराठी या विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ९४ हजार ५४४ एवढी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com