Teacher Awards: गुणवंत शिक्षकांना मोठी भेट! 123 गुरुजनांचा होणार सन्मान; क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार जाहीर

Savitrimai Phule State Teacher Awards 2026 News 123 Teachers Selected: महाराष्ट्रातील १२३ शिक्षकांची राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड. ३ डिसेंबरला मुंबईत होणार सन्मान सोहळा
Savitrimai Phule State Teacher Awards  2026 News 123 Teachers Selected
Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Teacher Award News: ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील १२३ गुणवंत शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २०२५-२६ या वर्षासाठीचे प्रतिष्ठेचे 'क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार' जाहीर केले आहेत. येत्या ३ डिसेंबर २०२६ रोजी मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात या सर्व पुरस्कारार्थी शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे.

यंदाच्या पुरस्कारांची सर्वात मोठी आणि उल्लेखनीय बाब म्हणजे ग्रामीण तसेच दुर्गम भागातील शिक्षकांनी या यादीत मिळवलेले घवघवीत यश. निवड झालेल्या १२३ शिक्षकांमध्ये तब्बल ८५ हून अधिक शिक्षक हे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळांमधील आहेत. यासोबतच दुर्गम आणि आदिवासी क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची गंगा पोहोचवणाऱ्या १९ प्राथमिक शिक्षकांची विशेष दखल घेऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे.

राज्य निवड समितीने २५ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या बैठकीत या सर्व शिक्षकांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर शासनाने २७ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (जीआर) प्रसिद्ध केला. यामध्ये प्रामुख्याने माध्यमिक गटातून सर्वाधिक ३९, तर प्राथमिक गटातून ३८ शिक्षकांची निवड झाली आहे. कला आणि क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या प्रत्येकी ८ विशेष शिक्षकांचाही यात समावेश आहे. तसेच, महिला शिक्षिकांच्या कार्याला सलाम करण्यासाठी 'क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका' या विशेष प्रवर्गातून ८ शिक्षिकांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय स्काऊट आणि गाईड विभागातून प्रत्येकी एक, तर दिव्यांग प्रवर्गातून जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वटार येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक उमेश अशोक बाविस्कर यांची निवड झाली आहे.

समाजाची निस्वार्थ सेवा करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात १९६२-६३ पासून ही पुरस्कार योजना सुरू आहे. २०२१-२२ मध्ये या योजनेच्या निकषांत सुधारणा करून तिला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे नाव देण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप अत्यंत सन्मानाचे असून, विजेत्या शिक्षकांना १० हजार रुपये रोख रक्कम दिली जाते. याशिवाय, राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शासनाच्या धोरणानुसार १ लाख रुपयांचे ठोक मानधनही प्रदान केले जाते.

मुंबईसह पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशा सर्वच विभागांतील शिक्षकांनी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या जोरावर या यादीत स्थान मिळवले आहे. पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण प्रवर्गनिहाय यादी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या घोषणेमुळे राज्याच्या शैक्षणिक वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.