
Mumbai News: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची दाणादाण उडवून महायुतीने महाराष्ट्रात महाविजय साकारला. पण या धडाकेबाज कामगिरीनंतर महायुतीसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.निकालाला तीन दिवस उलटल्यानंतरही महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. यामुळे पडद्यामागं घडत असलेल्या अनेक नाट्यमय घडामोडींनंतर महायुतीत (Mahayuti) सारंकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे. पण आता 'सीएम'पदाचा चेहरा जाहीर करण्यात होत असलेल्या विलंबामागे मोठं कारण असल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्रात तब्बल 132 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.2014 आणि 2019 नंतर सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत शंभरहून अधिक जागा जिंकणारा पक्षाचा मान भाजपला मिळाला. या यशामागे भाजपचं (BJP) शिस्तप्रिय आणि काटेकोर नियोजन,संघटन,अविरत मेहनत आहे.
यशानं हुरळून जायचं नाही आणि अपयशानं खचून जाता कामा नये हे सूत्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तळागळापर्यंत रुजवलं आहे.त्यामुळेच महायुतीत सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपनं आता मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्यासाठी कोणतीही घाईगडबड होताना दिसत नाही.
राज्याचा मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याविषयीची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. एकीकडे भाजपकडून देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित मानले जात आहे. तर दुसरीकडे शिंदेसेनाही मुख्यमंत्रिपदावर दावा करत आहे. पण प्रचंड बहुमत असतानाही भाजपच्या दिल्लीतील नेत्यांकडून सीएम पदाचा चेहरा ठरवताना एवढा वेळ का घेतला जात आहे, असा सवाल राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांनाही पडला आहे.
याबाबतच आता मोठी अपडेट समोर आली आहे.भाजपनं मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याआधी नव्या महायुती सरकारमधील खातेवाटपावर काम करणं महत्त्वाचं समजलं आहे. पुढचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी भाजप आणि महायुतीकडे पुरेसा अवधी मिळाला आहे.त्यामुळेच आधी खातेवाटपाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
या संदर्भात ABP न्यूजच्या या वृत्तवाहिनीने माहिती दिली आहे.राज्यातील भाजपच्या एका नेत्यानं याबाबतची अपडेट दिली आहे. त्यात ते म्हणाले,भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्याची कोणतीही घाई नाही.जनतेनं आम्हांला या निवडणुकीत निर्णायक जनादेश दिला आहे.
त्याचमुळे आधी सरकारमधील खातेवाटप आणि पालकमंत्रीपदांचं वाटप ठरवण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. नवीन सरकारमधील भविष्यातला मतभेद टाळण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचंही या नेत्यानं म्हटलं आहे.
दिल्लीतून महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीची अधिकृत घोषणा पुढील 48 तासांत होणार असल्याची माहिती आहे.
नवीन सरकारमध्ये सुरुवातीला मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांच्यासह एकूण 20 जणांचा शपथविधी होणार असल्याची अपडेट आहे. त्यात भाजप 10 एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 6 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.