Mumbai News: मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी 500 कोटींची ऑडिओ क्लिपनं राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप -शिवसेनेत या ऑडिओ क्लिपमुळे बिनसलं आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंनी 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन सुरू असलेल्या राजकीय शाब्दिक चकमकींवर तब्बल तीन दिवसांनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
कल्याण डोंबिवलीचे शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदेंनी पहिल्यांदाच मनोज जरांगे यांच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले,गेले दोन दिवस माझा त्यावरच रिसर्च सुरू आहे. ज्या कोणाकडे पाचशे कोटी पाठवले होते, तो माझ्यापर्यंत पोहोचला नाही. जरांगे पाटलांना जो प्रश्न पडला आहे, तोच मलाही पडला असल्याचा मिश्किल टिप्पणीही त्यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
खासदार शिंदे म्हणाले, ज्या कोणाकडे पाचशे कोटी पाठवले आहे,ते माझ्याकडे पोहोचले नाहीत. आता मी त्यालाच शोधायला चाललो आहे. आम्ही इथं एकत्र आता तीच चर्चा करत होतो की, पाचशे कोटी एकत्र कसे दिसतील? किती गाड्या लागतील? मला वाटतं, या साऱ्या गोष्टी आहेत, कोण काय बोलतं, त्याला काही अर्थ नाही असं म्हणत त्यांनी ऑडिओ क्लिपसंबंधीच्या चर्चांवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आता मनोज जरांगे पाटलांच्या समोर आणलेल्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची शहानिशा करण्यात येईल,याबाबतचे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.त्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत,त्या कळतीलच असंही शिवसेना नेते श्रीकांत शिंदेंनी सांगितलं. यावेळी त्यांनी पत्रकारांना उद्देशून तुम्ही पण त्या व्यक्तीला शोधताहेत, मी पण गेले दोन दिवस त्यावर रिसर्च करतो आहे. तुम्हांला कळलं,तर तुम्ही मला सांगा,मला कळलं तर मी तुम्हांला सांगतो, असा खोचक टोलाही खासदारांनी यावेळी लगावला.
तर मनोज जरांगेंच्या 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी त्यांनी मनोज जरांगेंच्या 500 कोटींच्या आरोपांवर आमचे प्रवक्ते, नेते बोलताहेत. आपण कुणाला 500 कोटी दिलेही नाही आणि कुणाकडून घेतलेही नसल्याचं म्हटलं आहे. तसेच या ज्याकाही आधारावर जरांगे पाटील हे बोलताहेत, त्याची अगोदर शहानिशा त्यांनी करायला पाहिजे होती. शहानिशा करुनच त्यांनी बोलायला पाहिजे होतं अशी भूमिकाही त्यांनी मांडली होती.
तसेच मनोज जरांगे यांच्याकडे 500 कोटींच्या जे काही पुरावे असतील, तेही त्यांनी संबंधित यंत्रणांकडे द्यावेत. त्याची चौकशी झाली पाहिजे. दुध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे, असंही एकनाथ शिंदेंनी ठणकावून सांगितलं होतं. यावेळी त्यांनी महाराष्ट्र, तसेच संपूर्ण देश एकनाथ शिंदेंला ओळखतो,असंही म्हटलं होतं.
एकनाथ शिंदेंनी यावेळी मनोज जरांगे हे मराठा समाजाचं काम करताहेत.त्यांनी मराठा समाजाचं काम केलं पाहिजे. ते समाजाचं काम करत होते, म्हणूनच मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं असंही ते म्हणाले होते. तसेच मराठा समाजाचंच काम मनोज जरांगे करत होते. म्हणून आम्ही त्यांना मदत केली. परंतू, त्यांनी समाजाचं काम करावं. जरांगेंनी त्याचा राजकीय प्लॅटफॉर्म बनू नये, असा खोचक सल्लाही एकनाथ शिंदेंनी जरांगेंना दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.