

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत नऊ उपोषणं केली. या सगळ्या उपोषणांमध्ये सरकारच्या वतीने पाठवण्यात आलेल्या शिष्टमंडळामध्ये सरकारमधील मंत्री, खासदार, आमदार मध्यस्थी आणि चर्चेसाठी अंतरवाली सराटीत यायचे. ३० मे रोजी झालेल्या आंदोलनाच्या काही दिवस आधी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांची सरकारकडून चर्चेसाठी जाणाऱ्या शिष्टमंडळात एन्ट्री झाली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस व त्यांच्या आईवर टीका करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना अंगावर घेण्यात आणि त्यांना कडक शब्दांत सुनावणाऱ्यांमध्ये प्रसाद लाड हे आघाडीवर असायचे.
जरांगे पाटील यांनीही हातचे न राखता आपल्या स्टाईलमध्ये प्रसाद लाड यांचा अनेकदा समाचार घेतला होता. परंतु ३० मे च्या उपोषणापुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाड यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चेची जबाबदारी सोपवली आणि जरांगे पाटील यांचा लाड यांच्याकडून माझे भाऊ असा उल्लेख केला जाऊ लागला. जरांगे पाटील यांच्याकडूनही प्रसाद लाड हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, समाजासाठी आलो म्हणून सांगत असल्याने आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकला म्हणत त्यांना योग्य सन्मान दिला गेला. ३० मे रोजीचे उपोषण २४ तासांत मागे घेतल्यानंतर सरकारकडून ज्या गोष्टी लेखी स्वरुपात दिल्या होत्या त्याच्या अंमलबजावणीवरून मनोज जरांगे पाटील पुन्हा नाराज झाले आहेत.
२९ तारखेपासून पुन्हा उपोषणाचा इशारा त्यांनी दिल्यानंतर पुन्हा संकट मोचकाच्या नव्या भूमिकेत असलेले प्रसाद लाड अंतरवालीत जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी येऊन गेले. नेहमीप्रमाणे या दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. जरांगे पाटील यांनी अंमलबजावणीचे काय? असा सवाल केला. तर सरकारकडून प्रमाणपत्र वाटपासाठी सुरू असलेले प्रयत्न आणि कामाची माहिती लाड यांनी जरांगेंना दिली. काही महिन्यापुर्वी एकमेकांवर तोंडसुख घेणाऱ्या जरांगे पाटील आणि प्रसाद लाड यांचे जुळलेले सूर पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. कालच्या अंतरवाली सराटीच्या भेटीत प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांच्या घरचा पाहुणचारही घेतला. शेजारी बसून जेवण करतानांचे त्यांचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर हेच का ते दोन नेते जे काही दिवसांपूर्वी एकमेकांवर टीका करायचे? असा प्रश्न निश्चितच पडतो.
लाड-जरांगे वाद..
प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्या मागील आंदोलनादरम्यान त्यांच्यावर टीका केली होती. प्रसाद लाड यांची जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू नये अशी प्रमुख मागणी होती. 'आजपर्यंत अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी फडणवीस यांच्या इतके मराठा आरक्षणासाठी काम केले नाही. फडणवीस यांच्यावर टीका खपवून घेतली जाणार नाही' असं लाड म्हणाले होते. जरांगे यांनी पण २०१७ पासून देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी काय केले याची गणना समोर ठेवावी, असं आव्हान लाड यांना दिलं होतं. जरांगेंनी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या आईवर टीका केली होती, तेव्हाही लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर तोंडसुख घेतले होते. खालच्या पातळीवर जाऊन जरांगे पाटील यांनी लाड यांना सुनावले होते.
मात्र जेव्हा हेच प्रसाद लाड चर्चेसाठी अंतरवली सराटीत येणार आहेत, असा त्यांचा फोन आला तेव्हा जुना वाद विसरून समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि मला तुम्ही भाऊ म्हणून संबोधल्यामुळे आम्ही तुमचे स्वागतच करू, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली होती. पत्रकारांसमोर लाड यांनी जरांगे पाटील यांचा आदर राखत त्यांना योग्य मान, सन्मान दिला होता. तर जरांगे पाटील यांनीही प्रसाद लाड मराठा समाजाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर ठोसपणे मांडून समाजाचं भलं करतील अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांच्यावर विश्वास टाकला होता. आता या दोघांना शेजारी बसून एकत्र जेवताना पाहून अनेकांना हायसे वाटत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.