

Marathwada Drought : मराठवाड्यात कायम दुष्काळाची परिस्थिती असते. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडत असल्याने शेती, सिंचन, पशुधनाचा प्रश्न वारवार निर्माण होतो. मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भागात येऊन सांगतात. मात्र, प्रत्यक्षात त्यासाठीच्या योजनांना वेग आणि अंमलबजावणीच्या बाबतीत मात्र उदासीनता दिसून येते.
धाराशीव जिल्ह्यातील कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पातून मिळणारे ७ टीएमसी पाणी याच कारणांमुळे अडले आहे. धाराशीव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी या प्रकल्पाच्या कामाची पाहणी करून यातील त्रुटी लक्षात आणून देत सरकारवर टीका केली. सरकारच्या दुर्लक्षामुळे ७ टीएमसी पाणी अडले असून दोन बोगदद्यांच्या कामाला ब्रेक लागल्याचा तसेच दोन पंपगृहाचे कामही अपूर्ण असल्याचे पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी दरम्यान निदर्शनास आणून दिले.
कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पातील नीरा-भीमा जोड बोगदा, जेऊर बोगदा आणि मिरगव्हाण पंपगृह या महत्त्वाच्या कामांची आज त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील गंभीर दिरंगाई समोर आली. दोन महत्त्वाच्या बोगद्यांची कामे पूर्णपणे बंद असून, पंपगृहाचे कामही अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या दुष्काळी भागाला मिळणाऱ्या हक्काच्या ७ टीएमसी पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे, असे त्यांनी सांगितले.
कृष्णा खोऱ्यातील ७ टीएमसी पाणी दुष्काळी मराठवाड्यात आणण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. नीरा नदीवरील उद्धट बंधाऱ्यातून २३.६८ किलोमीटर लांबीच्या नीरा-भीमा बोगद्याद्वारे पाणी उजनी जलाशयात आणले जाणार आहे. त्यानंतर जेऊर बोगद्याद्वारे हे पाणी मिरगव्हाण पंपगृहापर्यंत पोहोचवून सीना-कोळेगाव जलाशय आणि सीना नदीच्या माध्यमातून दुष्काळी भागाला उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. मात्र, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सद्यस्थिती पाहता सरकारच्या प्राधान्यक्रमाबाबत कैलास पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
धाराशिव शहरातून सांजा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे रुळांवर उभारण्यात येत असलेल्या नवीन पुलाच्या कामामध्ये गंभीर त्रुटी संदर्भातही कैलास पाटील यांनी काही प्रश्न उपस्थित केले. यापूर्वी धाराशिवहून सांजा गावाकडे जाणारा रस्ता सरळ होता. मात्र, नवीन पूल तिरक्या पद्धतीने उभारण्यात येत असल्याने रस्त्यावर अचानक वळण निर्माण होणार आहे. यामुळे भविष्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच अपघातांचा गंभीर धोका संभवतो, याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
संबंधित रेल्वे आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत पुलाच्या चुकीच्या अलाइनमेंटमध्ये तातडीने दुरुस्ती करून रस्ता आणि पूल एकाच सरळ रेषेत तयार करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या. विकासकामे ही नागरिकांच्या सोयीसाठी असतात, त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्यासाठी नाहीत. त्यामुळे कोणतेही विकासकाम करताना नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले पाहिजे, असेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.