Raigad Politics: रायगडमध्ये महायुतीत महाभारत! तटकरेंच्या आमदारकी-खासदारकीवरच घाव घालण्याचं शिवसैनिकांना आवाहन

Raigad Politics: रायगड जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
Gogawale Tatkare Ghosalkar
Gogawale Tatkare Ghosalkar
Published on: 
Updated on: 

Raigad Politics: रायगड जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. माणगाव येथे शिवसेनेच्या पक्षप्रवेश सोहळ्यात जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेत शिवसैनिकांना राष्ट्रवादीला राजकीय मैदानात चितपट करण्याचे आवाहन केले. रायगडचा खासदार शिवसेनेचाच, श्रीवर्धनचा आमदार शिवसेनेचाच आणि जिल्ह्यातील सर्व आमदार महायुतीचे झाले पाहिजेत, अशी भूमिका मांडत त्यांनी खासदार सुनील तटकरे आणि श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांच्या राजकीय वर्चस्वालाच आव्हान दिले.

माणगावमधील पक्षप्रवेश सोहळ्याच्या व्यासपीठावरून घोसाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले. रायगडमध्ये शिवसेनेची ताकद वाढविण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी आगामी राजकीय समीकरणांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व असले पाहिजे, असे स्पष्ट केले. शिवसैनिकांनी संघटित होऊन राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीयदृष्ट्या चितपट करण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Gogawale Tatkare Ghosalkar
Hardeep Singh Puri: हरदीपसिंग पुरी यांचा खासदारकीचा तडकाफडकी राजीनामा! नेमकं काय घडलंय?

रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. तर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आदिती तटकरे आमदार आहेत. त्यामुळे घोसाळकर यांनी रायगडचा खासदार आणि श्रीवर्धनचा आमदार शिवसेनेचा असावा, अशी भूमिका मांडणे हे तटकरे कुटुंबाच्या राजकीय प्रभावाला दिलेले थेट आव्हान मानले जात आहे.

विकास गोगावलेंचाही हल्लाबोल

या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य आणि पालकमंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. महाडमध्ये राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश झाला तर चालतो, मात्र आम्ही श्रीवर्धनमध्ये पक्षप्रवेश घडवून आणला की त्याला विरोध का केला जातो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या वक्तव्यातून दोन्ही पक्षांमधील स्थानिक पातळीवरील संघर्ष आणि एकमेकांच्या प्रभावक्षेत्रात हस्तक्षेप करण्यावरून असलेली नाराजी स्पष्ट झाली.

Gogawale Tatkare Ghosalkar
Laptop: केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकार मोफत देणार महागडे लॅपटॉप! किंमत अन् ब्रँड ऐकून थक्क व्हाल; नेमकी काय आहे योजना?

महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र असले, तरी रायगडमधील स्थानिक राजकारणात दोन्ही पक्षांमधील स्पर्धा कायम असल्याचे या वक्तव्यावरून पुन्हा समोर आले आहे. त्यामुळे घोसाळकर यांच्या या आक्रमक भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.