

Marathwada Graduate Election : "अठरा वर्षात काय केले, हे लोकांना सांगा. तीन टर्म आमदार एवढ्या मोठ्या मतांनी जेव्हा पडतो, तेव्हा त्यामागे काही कारणे असतात. घात झाला की आणखी काय झाले? हे बोलण्यापेक्षा पराभव मान्य करा, अभ्यास करा", असा सल्ला शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सतीश चव्हाण यांना दिला. "आमचा कार्यक्रम करण्याच्या धमक्या देऊ नका, आम्हीच २०२९ मध्ये पुन्हा तुमचा कार्यक्रम करू", असा इशाराही सत्तार यांनी चव्हाण यांना दिला.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार सतीश चव्हाण यांनी काल पत्रकार परिषदेत शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे नाव घेऊन त्यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाई करावी, अशी मागणी केली होती. तसेच सत्तार यांचा कार्यक्रम करण्यासाठी बरेच जण टपलेले आहेत, मी छोटा कार्यकर्ता आहे, अशा शब्दात सत्तार यांना सुनावले होते. या टीकेला सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले.
सत्तार म्हणाले, "मी माझ्या भूमिकेवर पहिल्यापासून ठाम आहे. निवडणुकीच्या मतदानापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत मी कुठेही भूमिका बदलली नाही. त्यामुळे मला धमक्या देण्याच्या भानगडीत सतीश चव्हाण यांनी पडू नये. एकदा पराभव झाला तो झाला, सहा वर्ष हा मोठा कालवधी आहे. 'जैसे कर्म करेगा,वैसे फल देगा भगवान, ये है गीता का ग्यान' या प्रमाणे तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ मिळाले आहे".
"हजारो मतांनी जेव्हा माणूस पडतो, तेव्हा त्याचा अभ्यास केला पाहिजे, अठरा वर्षात काय केले? हे तुम्हाला लोकांना सांगावे लागेल. ते न करता तुम्ही मनाची समजूत काढत आहात. पराभवाचे कारण तुम्हाला कळाले आहे. निवडून आलेले उमेदवार हे उच्चशिक्षित आहेत, त्यांनी प्रताप केला हे मान्य करावेच लागेल. राहिला प्रश्न सतीश चव्हाण यांनी कार्यक्रम करावे लागले, अशी भाषा वापरली त्याचा. माझे त्यांना आव्हान आहे, त्यांनी वेळ, दिवस, ठिकाण ठरवावे आम्ही तयार आहोत", असे आव्हानही अब्दुल सत्तार यांनी चव्हाण यांना दिले.
"आम्ही उघडपणे तुमच्या विरोधात काम केले, पाठीमागून काहीही केले नाही. २०२९ मध्ये प्रतापसिंह पाटीलच तुमचा पुन्हा कार्यक्रम करतील. त्यामुळे आम्हाला धमक्या देण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका, असा सल्लाही सत्तार यांनी दिला.नव्याने निवडून आलेले आमदार हे उच्चशिक्षित, मराठवाड्यात त्यांच्या स्वतःच्या संस्था आहेत. त्यांचे भाऊ पंधरा वर्षापासून राजकारणात आहेत. डाॅक्टर असलेल्या व्यक्तीने तुमचे ऑपरेशन केले आहे", असा टोलाही सत्तार यांनी चव्हाण यांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.