

Cyber Crime News: ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असताना सायबर भामट्यांनी आता चक्क ईडी अधिकाऱ्यांची ओळख धारण करून फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. लातूरमध्ये एका ६६ वर्षीय निवृत्त कर्मचाऱ्याची तब्बल २८ लाख ५१ हजार ९९९ रुपयांची फसवणूक करण्यात आली. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली अटकेची भीती दाखवून आरोपींनी रक्कम उकळली. या प्रकरणात लातूर पोलिसांच्या सायबर विभागाने मध्यप्रदेश, दिल्ली आणि हरियाणा येथून सहा आरोपींना अटक केली आहे.
आरोपींनी निवृत्त कर्मचाऱ्याशी संपर्क साधत आपण पोलीस, एटीएस आणि अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी असल्याचे भासवले. तुमचा १२२ कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहभाग असून दहशतवाद्यांशीही संबंध आहेत, असा खोटा दावा त्यांनी केला. या प्रकरणात अटक होऊ शकते, तसेच समाजात बदनामी होईल, अशी धमकी देत आरोपींनी त्यांच्यावर दबाव निर्माण केला.
आरोपींनी ईडीच्या नावाने बनावट पत्र पाठवून निवृत्त कर्मचाऱ्याला आणखी भीती दाखवली. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बँक खात्यातील रक्कम पडताळणीसाठी दुसऱ्या खात्यात हस्तांतरित करावी लागेल, असे त्यांना सांगण्यात आले. अटक आणि बदनामीच्या भीतीने निवृत्त कर्मचाऱ्याने आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये तब्बल २८ लाख ५१ हजार ९९९ रुपये जमा केले.
या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर लातूर सायबर पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान या फसवणुकीत सहभागी असलेल्या सहा आरोपींची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानुसार मध्यप्रदेशातील तीन, दिल्लीतील दोन आणि हरियाणातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. फसवणुकीची रक्कम कोणकोणत्या बँक खात्यांमध्ये वळवण्यात आली, या टोळीत आणखी किती जणांचा सहभाग आहे आणि या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास लातूर सायबर पोलीस करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.