

जलील पठाण
Ausa Assembly Constituency News : औसा नगरपालिकेत टाकलेले डाव जरी उलटे पडले असले तरी आमदार अभिमन्यू पवार यांचे मतदारसंघातील बेरजेचे राजकारण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही वर्षात पवार यांनी आपल्या विरोधकांना सोबत घेत मतदारसंघातील राजकारण बदलून टाकले आहे. माजी आमदार बसवराज पाटील यांनी काही महिन्यापुर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांनीही भाजपची वाट धरली आहे.
काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या काळात औसा मतदारसंघावर दिनकर माने यांची पकड होती. दोनवेळा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तेच माने आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या प्रवेशासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनीच पुढाकर घेतल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू असताना औसा मतदारसंघातही मोठ्या उलथापालथींचा सिलसिला सुरू आहे.
भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी 2014 आणि 2024 मध्ये त्यांच्या विरोधात विधानसभा लढवलेल्या दोन्ही माजी आमदारांना शांतपणे आपल्या गोटात घेतले असून 2029 च्या राजकीय रणधुमाळीसाठी त्यांनी मोठी बीजे रुजवली असल्याच्या चर्चा या निमित्ताने होत आहेत. 2014 मध्ये पवारांनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार बसवराज पाटील मुरुमकर यांचा पराभव करत राजकारणात एन्ट्री केली. पुढे 2024 च्या आधीच पाटील यांना भाजपमध्ये दाखल करून घेत पवारांनी पहिला मोठा मास्टर स्ट्रोक लगावला.
2024 मध्ये त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार दिनकर माने यांनाही पराभूत केले. आता त्याच माने यांचे पवार 'घरचे उमेदवार' बनवतील, हे कुणाच्याच ध्यानात आले नाही. नुकतीच अभिमन्यू पवार यांनी अत्यंत गुप्तता पाळत माने कुटुंबाशी चर्चा करत त्यांच्या पक्ष प्रवेशाची सगळी तयारी केली. जिल्हा परिषदेसाठी आशीव गटातून माने यांच्या सून सदिच्छा माने यांना, तर उजनी गटातून माने यांचे जवळचे समर्थक संदीपान शेळके यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
दोन प्रमुख विरोधकांना एका मागोमाग पक्षात घेताना पवार यांनी औसा मतदारसंघावर आणखी मजबुत पकड मिळवली आहे. स्थानिक पातळीवर ही मोठी राजकीय चाल असली तरी पुढील साडेतीन वर्षांत हे दोन्ही नेते पवारांच्या घरातच टिकतील का? की नवे राजकीय समिकरण घडताच घर बदलतील? यावर पवारांच्या संपूर्ण राजकीय गणिताचे भवितव्य ठरणार आहे.
लातूर महानगरपालिकेत आमदार अमित देशमुख यांनी काँग्रेसचा झेंडा फडकावत 'काँग्रेस संपलेली नाही' हा संदेश दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य दृश्यमान आहे. त्याच उत्साहाच्या पार्श्वभूमीवर औसात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिनकर माने कमळ हाती घेत असल्याची घोषणा झाली. ज्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले.
बसवराज पाटील आणि दिनकर माने हे दोन्ही नेते पवारांच्या विरोधात लढलेले, जनाधार असलेले व राजकीय वजन असलेले नेते आहेत. हे दोघेही आता भाजपात आणि अप्रत्यक्षपणे पवारांच्या गोटात असल्याने औसा मतदारसंघातील सत्तेची समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. विशेष म्हणजे, माने यांच्या भाजप प्रवेशा बाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात पवार यांना चागलेच यश आले.
अभिमन्यू पवार यांना सध्या मतदारसंघात तुल्यबळ विरोधक नाही, असे बोलले जाते. अशावेळी 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना नवा प्रतिस्पर्धी कोण असेल? यावरही चर्चा होत आहे. यात प्रामुख्याने काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन शाम भोसले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डाॅ. अफसर शेख यांचे नाव समोर येते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आडून पवारांनी विरोधी गोटात लावलेला 'सुरूंग' भविष्यात त्यांच्यासाठी मोठा दिलासा ठरू शकतो, असा अंदाज आहे. जिल्हा परिषद–पंचायत समिती तिकिट वाटपावरून झालेली नाराजीही लवकरच निवळेल, आणि पवारांच्या निर्णयाला गोटातील नेते सहमती देतील, असे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.