

Chhatrapati Sambhajinagar, 10 May : राजकारणात आपण लोकांची, समाजाची सेवा करण्यासाठी येतो. पण सध्या सोशल मीडियावर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्वत:चे रील, व्हिडिओ बनवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. बरं या व्हिडिओमुळे अनेकदा स्वत:चीच अडचण होते, हे लक्षात येऊनही अनेकांना हा मोह सुटत नाही. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील एमआयएमच्या काही नगरसेवकांना या 'रिल'चा चांगलाच नाद लागला आहे. याचा फटकाही काही जणांना बसल्याचे पहायला मिळाले.
रिल बनवून सोशल मीडियावर चमकोगिरी करणाऱ्या पक्षातील नगरसेवकांना असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी चांगलेच फटकारले. रिल, व्हिडिओ बनवून काही होणार नाही. तुम्हाला समाजात काम करावे लागेल. लोकांची कामे केली तर ते तुम्हाला ओळखतील, असा सल्ला त्यांनी नगरसेवक पदाधिकाऱ्यांना दिला. मी घरातून निघालो, इथे चाललो, तिथे चाललो याचे व्हिडिओ करून ते व्हायरल करण्यात काय अर्थ आहे? हेच करायचे असले तर मग राजकारणात कशाला आले? चित्रपटात जा, असा टोलाही ओवेसी यांनी लगावला.
'एसआयआर' विषयावरील मार्गदर्शन कार्यशाळेसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) ओवेसी आले होते. निदा खान प्रकरण, नगसेवक मतीन पटेलवर निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप, एमआयएमवर बंदी घालण्याची मागणी, या सगळ्या विषयांना ओवेसी यांनी उत्तरे दिली. दरम्यान, पक्षाला अडचणीचे ठरू पाहत असलेले नगरसेवकांमधील ‘रिल’चे वाढते फॅड पाहता ओवेसी यांनी आपल्या नगरसेवकांचे कान टोचण्याचे काम केले आहे.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत एमआयएमला मोठे यश मिळाले. तरुण आणि नव्या चेहऱ्यांना इम्तियाज जलील यांनी मोठा विरोध पत्करून उमेदवारी दिली. हे नवे चेहरे मोठ्या संख्येने निवडूनही आले. पण राजकारणात नवे असल्यामुळे कामापेक्षा सोशल मीडियावरील रिल, व्हिडिओ आणि त्याला मिळणाऱ्या प्रतिसादातच ते अडकले.
शहरातील अतिक्रमण हटाव पथकाला विरोध करताना अशाच रिल आणि व्हिडिओमुळे एमआयएमच्या नगरसेवकांच्या अडचणी वाढल्या होत्या. हडको भागातील कचरा संकलन उपकेंद्राला विरोध करताना वापरलेली भाषा, अधिकाऱ्यांना दिलेली धमकी याचा सगळा पुरावाच या रिलमधून प्रशासनाच्या हाती लागला होता. या आधारे एमआयएमच्या नगरसेवकांवर गुन्हेही दाखल झाले होते.
अशा चमकोगिरी करणाऱ्या नगरसेवकांना प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी वारंवार सूचना, समजही दिली. काल ओवेसी यांच्यासोबत झालेल्या पक्षीय चर्चेतही हा विषय समोर आला. यावर ओवेसी यांनी पक्षातील तरुण नगरसेवकांना मोलाचा सल्ला देताना शालजोडेही लगावले. समाजात जा, त्यांच्यासाठी काय काम करत आहात, हे लोकांना दाखवा. तुम्ही घरातून बाहेर कधी पडलात, दिवसभर कुठे गेलात, काय केले? याच्याशी लोकांना काही देणेघेणे नाही.
समाजात टीकायचे असेल तर लोकांची कामे करावी लागतील, त्यातून तुमची खरी ओळख निर्माण होईल. एवढाच रिल, व्हिडिओ बनवण्याच नाद असले तर राजकारणात तुमच्यासाठी जागा नाही, तुम्ही चित्रपटात गेले पाहिजे, असा टोला ओवेसी यांनी लगावला. कान टोचल्यानंतर तरी एमआयएमच्या नगरसेवकांचा हा रिल, व्हिडिओ मोह संपतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.