

Beed Politics News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यापासून त्यांच्या प्रत्येक दौऱ्याची चर्चा होत असते. सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे यांच्या हत्या, बीड जिल्ह्यात वाढणारी गुंडगिरी, दहशत, अत्याचाराच्या घटनांमुळे राज्यभरात या जिल्ह्याची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असलेल्या या जिल्ह्याला सरळ मार्गावर आणण्याचा निर्धार अजित पवार यांनी केला आहे. या मार्गात येणारे सगळे अडथळे टप्प्या टप्प्याने अजित पवार दूर करतांना दिसत आहेत.
अशात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी दीड- दोन वर्षानंतर दोन्ही पक्षांचे सूर पुन्हा जुळू लागले आहेत. याचा प्रत्यय पुणे, पिंपरी-चिंचवडनंतर आता बीडमध्येही आला आहे. काल (शुक्रवारी) अजित पवारांचा बीड दौरा झाला आणि या दौऱ्यातील अनेक घडामोडी या जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या ठरू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आक्षेप असलेल्याा माजी मंत्री धनंजय मुंडे यांना लांब ठेवून अजित पवार मुंडे विरोधकांना बळ देताना दिसत आहेत.
अजित पवार यांच्या बीड दौऱ्यामध्ये विकास कामांच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी सर्व पक्षीय आमदार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदारही उपस्थित होते. सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर बीडमधून अजितदादा पुण्याकडे हेलिकॉप्टरमधून जात असताना त्यांच्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे हे देखील दिसून आले. सोनवणे यांना आपल्या हेलिकाॅप्टरमधून दिलेली लिफ्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
ही चर्चा शांत होत असतानाच आज (ता.3) बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांना पुण्यात बोलावून घेत अजितदादांनी चर्चा केली. क्षीरसागर अजित पवारांना भेटायला जिजाई बंगल्यावर गेले. तरी, भेटीनंतर बीड जिल्ह्यातील पाण्याच्या प्रश्नांसंदर्भात भेट घेतली. मी एवढा मोठा नाही. पवार कुटुंब एकत्र आलं तर आनंद, एकत्र आलं तर ताकद वाढेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
तसं पाहिलं तर विकासकामात अजित पवार कधी पक्ष, हा माझा, तो त्याचा असा भेद करत नाहीत अशी त्यांची प्रतिमा आहे. पण राजकारणात भल्या भल्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यातही त्यांचा हात कोणी धरू शकत नाही, हे ही तितकेच खरे. जिल्हा परिषदे अंतर्गत विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपुजन आणि उद्घाटन करत अजित पवारांनी बीड नगरपालिकेनंतर जिल्हा परिषदेवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले आहे.
विशेषतः बीड नगरपालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासह सर्वाधिक नगरसेवक निवडून आणत सत्ता मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही चांगले यश मिळवले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत हाच ट्रेंड कायम राहिल असा अंदाज आहे. अशावेळी काकांच्या पक्षातील खासदार, आमदारांना बळ देत जिल्हा परिषदेवरही राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा अजित पवारांचा डाव दिसतो आहे. त्यामुळे क्षीरसागर म्हणतात तसे फक्त पाण्याच्या प्रश्नावर भेट होत असली तरी राजकारणात एक अधिक एक दोन अशी समीकरणं कधीच नसतात हेही तितकेच खरे आहे.
नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बीडमध्ये मिळालेले यश हे धनंजय मुंडे यांच्याशिवाय मिळाले आहे. स्टार प्रचारक म्हणून नेमणूक केली असली तरी धनंजय मुंडे यांना परळी, गंगाखेड या दोन तालुक्यापुरते मर्यादित ठेवत अजित पवारांनी एकप्रकारे त्यांना लांबच ठेवले होते. उलट बीडमध्ये आपले विश्वासू अमरसिंह पंडित आणि गेवराईचे विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपवली आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाला नवा पर्याय निर्माण केला.
या जोडीनेही अजित पवारांचा विश्वास सार्थ ठरवत बीड नगरपालिकेत असलेल्या क्षीरसागरांच्या 35 वर्षांच्या वर्चस्वाला हादरा देत पालिका जिंकली. आमदार संदीप क्षीरसागर यांना नगरपालिकेत मिळालेले यश, योगेश क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यांची वाढलेली संख्या हे पाहता पुर्णपणे नगरपालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी पंडितांना अजून बरीच महेनत घ्यावी लागणार हे स्पष्ट आहे.
अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड शहरात मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्याला जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्या पंकजा मुंडे, स्व पक्षातील आमदार धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती खटकण्यासारखी होती. पण यावरून वादंग निर्माण होईल याची जाणीव असल्याने स्वतः धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मिडिया पेजवरून आणि अजित पवारांनी प्रत्यक्ष आपल्या भाषणातून खुलासे केले. पण असे असले तरी या दोघांची अनुपस्थिती हा साधा विषय नाही.
धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत त्यांचे जिल्ह्यातील सर्व राजकीय विरोधक मात्र व्यासपीठावर आवर्जून हजर होते. खासदार बजरंग सोनवणे,आमदार प्रकाश सोळुंके,संदीप क्षीरसागर अशी अनेक मंडळी यावेळी होती. विशेष म्हणज बजरंग सोनवणे यांना तर अजित पवारांनी आपल्या हेलीकाॅप्टरमध्ये बसवून घेत द्यायचा तो सूचक इशारा दिलाच. याची चर्चा होत नाही तोच आज शुक्रवारी (ता.3) बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची अजित पवारांशी पुण्यात भेट झाली.
सोनवणे, क्षीरसागर हे जरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार, आमदार असले तरी त्यांचे एकसंध असलेल्या राष्ट्रवादीतील अजित पवारांशी जिव्हाळ्याचे संबंध कायम आहेत. जिल्ह्यातील बदलती राजकीय परिस्थिती पाहता अजित पवारांकडून बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर या धनंजय मुंडे यांच्या विरोधकांना दादांकडून मिळणारे बळ बीडच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.