
Shivsena UBT News : शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे जाहीर कौतुक केले. 'क्या हुआ तेरा वादा' म्हण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मराठवाड्यात उभारण्यात आलेल्या जन आंदोलनाची ठाकरे यांनी स्तुति केली. त्यानंतर अंबादास दानवे पुन्हा आक्रमक झाले असून उद्या शेतकर्यांच्या पीक कर्जासाठी ते बँकांवर धडक देणार आहेत.
शिवसेना मेळाव्यात अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या भाषणाने प्रभावित झालेल्या उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात दानवे यांचे कौतुक करत त्यांच्या पाठीवर थाप दिली. मराठवाड्यातील शेतकर्यांच्या प्रश्नावर त्यांनी उभारलेल्या जन आंदोलनाची सर्वत्र कौतुक आणि चर्चा होत असताना उद्धव ठाकरेंकडूनही शाबासकी मिळाल्याने अंबादास दानवे याचा उत्साह अधिकच वाढला आहे. शेतकर्यांचे आंदोलन केवळ मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रात उभारले जावे, अशी अपेक्षाही अंबादास दानवे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली होती.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याचा उल्लेख करत अंबादास दानवे यांचे तोंडभरून कौतुक केले. त्यानंतर पीक कर्जाच्या प्रलंबित फायलींवर बँकांच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी उद्या अंबादास दानवे शिवसैनिक आणि शेतकऱ्यांना सोबत घेऊन बँकांवर धडकणार आहेत. फायली प्रलंबित का ठेवल्या? याचा जाब विचारण्यासाठी हे आंदोलन असल्याचे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले आहे. छत्रपती संभाजीनगर आणि एकूणच जिल्ह्याच्या राजकारणात अंबादास दानवे यांनी पक्षातील दुसरे नेते चंद्रकांत खैरे यांना खूप मागे टाकल्याचे चित्र आहे.
पक्षासाठी सर्वाधिक वेळ देणारा आणि पक्षाची ध्येय-धोरण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणारा नेता उद्धव ठाकरे यांना हवा आहे. अंबादास दानवे यांचे संघटन कौशल्य आणि आक्रमकता यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक ठरत आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात खैरे विरुद्ध दानवे असा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या दरबारात दोन्ही नेत्यांनी अनेकदा आमचे मतभेद संपले असे, जाहीर केले. मात्र मातोश्रीवरून परतल्यानंतर जिल्ह्यामध्ये पुन्हा या दोन्ही नेत्यांची तोंड विरुद्ध दिशेला असतात हे आता नवीन नाही.
उद्धव ठाकरे यांनी मात्र चंद्रकांत खैरे यांच्यापेक्षा अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाला पसंती दर्शवत संभाजीनगर व मराठवाड्यातील शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठीची जबाबदारी सोपवल्याचे चित्र आहे. 'क्या हुआ तेरा वादा' या जन आंदोलनाने शिवसेनेची चर्चा राज्यभरात झाली. सत्ताधारी मंत्री, आमदार, खासदार यांच्या कार्यालय व निवासस्थानावर धडक देत थेट त्यांना जाब विचारण्याचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला.
या यशाबद्दल उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांचे कौतुक तर केलेच पण भविष्यात त्यांच्यावर मोठी संघटनात्मक जबाबदारीही सोपवली जाण्याचे संकेतही दिले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अंबादास दानवे हेच जिल्ह्यातील निर्णय घेतील, असेही बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.