

Marathwada Politics News : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाडी निवडणूक आणि तिचा निकाल जाहीर होऊन आता काही दिवस उलटले आहेत. महाविकास आघाडीने मराठवाड्यात ४४ आमदार आणि चार मंत्री असलेल्या महायुतीला धोबीपछाड दिला. तीन टर्म आमदार राहिलेल्या सतीश चव्हाण यांचा तब्बल साडेअठरा हजार मतांनी पराभव झाल्यानंतर सत्ताधारी युतीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
तर ठरल्याप्रमाणे मोहिम फत्ते झाल्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अंबादास दानवे, राहुल पाटील आणि डाॅ. प्रतापसिंह पाटील एकत्र आले होते. एकमेकांशी गप्पा मारतांना त्यांनी हस्तांदोलन करत टाळीही दिली.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे पहायला मिळाले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दिलीप घुगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने डाॅ. प्रतापसिंह पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. राज्यात महाविकास आघाडी एकत्र असताना दोन उमेदवार कसे? असा प्रश्न त्यावेळी उपस्थित करण्यात आला.
यावर अंबादास दानवे यांनी घुगे यांच्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलेल्या पदवीधरांच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाव घेत थेट आरोप केला होता. प्रतापसिंह पाटील व राष्ट्रवादीला आम्ही उमेदवार देण्यापुर्वी काही महिने आधीच तुम्ही मराठवाडा पदवीधरची निवडणूक लढवणार आहात का? अशी विचारणा केली होती. आमच्या पक्षाने प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी संदर्भात विचारणाही केली होती. परंतु तेव्हा राष्ट्रवादीने आम्ही मराठवाडा पदवीधरची निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यानंतरच आम्ही लढण्याचा निर्णय घेतला, असा दावा अंबादास दानवे यांनी केला होता.
दिलीप घुगे यांच्यासाठी अंबादास दानवे यांनी मराठवाड्यात प्रचारही केला. पण प्रत्यक्ष निवडणुकीत घुगे यांची गाडी आठ हजार मतांच्या पुढे गेली नाही. दरम्यान, दिलीप घुगे हे मॅनेज उमेदवार आहेत, असाही आरोप सत्ताधारी महायुतीकडून केला गेला. पक्षाचा उमेदवार असूनही परभणीचे आमदार डाॅ. राहूल पाटील हे या निवडणुकीत प्रचारापासून अलिप्त राहिले. उघडपणे त्यांनी आपले सख्खे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांचाही प्रचार केला नाही. पण पडद्यामागून सगळी सूत्रं तेच फिरवत होते, हे आता स्पष्ट झाले आहे.
प्रतापसिंह पाटील यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार दिलीप घुगे हे माघार घेऊन, मला पाठिंबा देणार होते? असे सांगितले होते. परंतु ते शेवटपर्यंत निवडणुकीत कायम होते. त्यांच्या उमेदवारीचा प्रतापसिंह पाटील यांना फायदाच झाला, असे आता बोलले जात आहे. महाविकास आघाडीतील या दोन घटक पक्षांमधील ही लुटूपूटुची लढाई होती. खरी लढत महायुतीच्या विरोधातच होती. निवडणूक झाली, निकाल लागला , महाविकास आघाडीचे प्रतापसिंह पाटील हे विजयी झाले आहेत. त्यानंतर आज विभागीय आयुक्त कार्यालयात अंबादास दानवे, राहुल पाटील, प्रतापसिंह पाटील यांच्यामध्ये बराच वेळ खल सुरू होता. एकमेकांशी हस्तांदोलन आणि टाळी देत जणू मोहिम फत्ते केल्याबद्दल ते आनंद व्यक्त करत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.