

Shivsena UBT News : शेतकऱ्याच्या कांद्याला आधी एक रुपये प्रतिकिलो असा कवडीमोल भाव मिळाला. बाजार समितीत कांदा विकायला आलेल्या शेतकऱ्याला यामुळे खिशातूनच पैसे टाकण्याची वेळ आली. राज्यभरात हमीभावाचे काय झाले? अशी चर्चा सुरू झाली. तेव्हा कुठे शासनाने आता 12 रुपये प्रतिकिलो दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण तोपर्यंत अर्ध्याहून अधिक कांदा शेतकऱ्यांनी रस्त्यावर टाकून दिला होता.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडत आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहिल्यादांच समृद्धी महामार्गावर उतरत तो रोखला. विधान परिषदेवर दुसऱ्यांदा निवड झालेले आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक समृद्धी महामार्गावर धडकले, त्यांनी रस्त्यावर टायर जाळून आपला संताप व्यक्त केला.
दानवे यांच्यासह आंदोलक, शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालत सरकारला धारेवर धरले. या आंदोलनामुळे काही काळ समृद्धी महामार्गावर तणावाचे वातावरण होते. पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहनांसाठी महामार्ग खुला करून दिला. यावेळी अंबादास दानवे व आंदोलक चांगलेच आक्रमक झाले होते.
इतिहासात पहिल्यांदाच समृद्धी महामार्गावर शिवसैनिकांचा बुलंद आवाज घुमल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला. जांबरगाव इंटरचेंज चक्काजाम करून शिवसैनिकांनी समृद्धी महामार्ग रोखला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी या सरकारला दाखवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
नाफेडमार्फत तात्काळ कांदा खरेदी सुरू करा, कांद्याला किमान ₹2 हजार हमीभाव आणि ₹1500 अनुदान द्या, निर्यात कायमस्वरूपी खुली ठेवून खत अनुदान थेट खात्यात जमा करा, कांदा चाळीसाठी 75% अनुदान व दर्जेदार बियाणे सवलतीत द्या, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शांतता असताना अंबादास दानवे यांनी मात्र आमदार होताच पुन्हा आक्रमक होत शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घातल्याचे दिसून आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.