

Shivsena UBT : राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीची पिछेहाट झाली. महाविकास आघाडीने तीन जागा जिंकत सत्ताधारी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या पक्षांना धक्का दिला आहे. यावरून युतीमध्ये वादाची ठिणगी पडलेली असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेल्या काही योजनांमुळे राज्य कर्जबाजारी झाले आहे. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठीही सरकारकडे पैसे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या एकएक योजना बंद करत आहेत, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
विधान परिषदेच्या पाच जागांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमध्ये याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहे. भाजपा-शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोप करत तुटून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महायुतीवर टीका केली. महायुती आणि भाजपमधील नेत्यांना आलेली मस्ती आणि जनतेची झालेली फसवणूक या निवडणुकीच्या निकालातून उघडी पडली आहे. जनता जेव्हा सत्ता उलथवून टाकते, तेव्हा कितीही मोठी फौज किंवा सत्ता पाठीशी असली तरी ती टिकत नाही, हे या निवडणूकीत दिसून आले.
महायुतीमधील नेत्यांना केवळ सत्तेचे प्रेम असून, ईडी, सीबीआयच्या भीतीपोटी हे सर्वजण एकत्र येऊन सत्तेला चिकटून बसले आहेत. निवडणुका संपल्यानंतर आणि उमेदवार पडल्यानंतर आता पक्षांतर्गत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. संभाजीनगर असो वा अमरावती, महायुतीमधीलच लोक एकमेकांच्या विरोधात आतून काम करत होते.अब्दुल सत्तार यांनी उघडपणे महाविकास आघाडीच्या बाजूने काम केल्याची कबुली दिली, याकडेही दानवे यांनी लक्ष वेधले.
नागपूर पदवीधर मतदारसंघातील पराभव हा भाजपसाठी लाजीरवाणा म्हणावा लागेल. देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ज्या नागपूर मतदारसंघाचे नेतृत्व केले, आज त्याच मतदारसंघात भाजपचा पराभव होत आहे, यावरून राज्यातील हवा स्पष्ट होते, असे दानवे म्हणाले. कधीकाळी देशात काँग्रेसचा दगड जरी उभा केला तरी तो निवडून यायचा; परंतु आज केंद्र आणि राज्यात प्रचंड बहुमत व सत्ता असूनही भाजपला पराभवाचा सामना करावा लागत आहे, असा टोला त्यांनी लगावला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला कर्जबाजारी करून ठेवले आहे, असा आरोप दानवे यांनी केला. शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना ज्या योजना सुरू केल्या होत्या, त्या आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हळूहळू बंद करत आहेत. सरकारच्या या दुटप्पी भूमिकेमुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. राज्यातील अतिवृष्टी आणि पीक नुकसानीच्या भरपाईसाठी सरकारने जाहीर केलेली 5 हजार रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी आहे.
आधी सरसकट मदतीची घोषणा करून नंतर 33 टक्के नुकसानीची अट लादणे हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे. निकषांच्या जाळ्यात अडकवून बऱ्याच शेतकऱ्यांना एक किंवा दोन हजार रुपये मिळतील किंवा काहींना तेही मिळणार नाहीत. एका शेतकऱ्याला किमान एक लाख रुपयांच्या मदतीची गरज असून, दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने मदत जमा झाली पाहिजे, असेही अंबादास दानवे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.