Marathwada Shivsena News : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मागची लगीन घाई आता संपली आहे. आता पुन्हा त्यांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांविरोधात दंड थोपटले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची नियोजन समितीची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीसाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात करण्यात आला होता.
जिल्हाधिकाऱ्यांनी डीपीसी बैठकीसाठी ज्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची यादी केली होती, त्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जात होता. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे (Ambadas Danve) हे बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येताच माध्यमांनी त्यांना गाठले. डीपीडीसीच्या बैठकीसाठी लावलेल्या प्रचंड पोलिस बंदोबस्तावरून दानवे यांना प्रश्न विचारला. विरोधकांच्या भितीमुळे प्रशासनाने हा बंदोबस्त लावला आहे का? यावर ` ये डर अच्छा है`, असे म्हणत सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला.
मराठवाड्यात होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठका सध्या वादग्रस्त होत आहेत. नुकतीच हिंगोली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यात पालकमंत्री अब्दुल सत्तार हे आॅनलाईन सहभागी झाले होते. परंतु, याच बैठकीत सत्तार आणि त्यांच्या पक्षाचे जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील यांच्यात खडाजंगी, शिवीगाळ झाली. एकमेकांचा उद्धार करत त्यांनी भ्रष्टाचार, टक्केवारीचे एकमेकांवर आरोप करत आव्हान दिले.
या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत इतर कुणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. शिवाय सत्ताधारी विरोधकांमध्ये वाद होऊन काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात केला. दरम्यान, मागच्यावेळी झालेल्या बैठकीत पालकमंत्री संदीपान भुमरे (sandipan bhumre), मंत्री अब्दुल सत्तार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातही खडाजंगी झाली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
निधीचे असमान वाटप होत असल्याचा आरोप करत दानवे यांनी कोणत्या मतदारसंघात किती निधी दिला, याचा हिशेब पालकमंत्र्यांकडे मागितला होता. यावरून दोघांमध्ये वाद इतका विकोपाला गेला, की दानवे खुर्चीतून उठून भुमरेंच्या अंगावर धावून गेले होते.
दुसरीकडे ठाकरे गटाचे कन्नडे आमदार उदयसिंह राजपूत यांनीही सभागृहात आपण शिंदेसेनेसोबत गेलो नाही म्हणून आपल्यावर पालकमंत्री सूड उगवत असल्याचा गंभीर आरोप करत कागदपत्रांची फाईल सभागृहात भिरकावली होती. मागच्या बैठकीतील हा प्रकार पाहता जिल्हा प्रशानाने यावेळी पुरेशी काळजी घेतली. परंतु, विरोधकांच्या भितीमुळेच हा बंदोबस्त लावण्यात आला का? असे दानवेंना विचारले तेव्हा मात्र त्यांनी ये डर अच्छा है म्हणत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.
(Edited by Sachin Waghmare)