Dharashiv News: विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता काही दिवसाचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर केल्या जात असलेल्या आरोप- प्रत्यारोपामुळे निवडणूक प्रचारात रंगत येत आहे. प्रचार सभेवेळी एकमेकांवर केल्या जात असलेल्या टीका-टीप्पणी, खिल्ली उडवण्याच्या राजकारणाला आता सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात राजकारणात गेल्या पाच वर्षात मोठे बदल झाले आहेत. दोन पक्षांत उभी फूट पडली आहे. त्यामुळे दोन पक्षांचे रुपांतर आता चार पक्षांमध्ये झाले आहे. त्यासोबतच भाजप आणि काँग्रेस हे पक्षदेखील आहेत. त्या पक्षांमधील अंतर्गत कलह आणि गटबाजीमुळे या निवडणुकीत प्रचंड ट्विस्ट असतानाच तुळजापुरमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार सभेत माजी मंत्री अमित देशमुख यांनी गाण्याचे सूर आवळत भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका केली.
काँग्रेसचे (Congress) नेते अमित देशमुख यांच्या हस्ते तुळजापूरमधील काँग्रेसचे उमेदवार धीरज पाटील यांच्या हस्ते प्रचाराची सुरुवात करण्यात आली. या प्रचारसभेत गाणी म्हणत मंत्री अमित देशमुख यांनी राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राणा पाटील यांच्या पत्नी घड्याळ घेऊन उभ्या होत्या. आता ते कमळ घेऊन उभे आहेत. त्यामुळे लोक आता म्हणत आहेत पाटील गावाकडे चला, असा टोला देशमुख यांनी लगावला.
यावेळी राणा पाटील मत मागायला आले की तुम्ही त्यांना म्हणा, ''मुझको राणा जी माफ करना गलती म्हारे से हो गई'”, असे गाणं म्हणत अमित देशमुख यांनी राणा पाटील यांच्यावर निशाणा साधला. यावेळी अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्या या ओघवत्या शैलीतील खुमसदार भाषण शैलीमुळे व गाणे आणि शायरी म्हणत केलेल्या या भाषणामुळे तुळजापूरकरांना त्यांचे वडील व दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची आठवण झाली.
यावेळी अमित देशमुख यांनी 'स्वर्गीय विलासराव देशमुख की बात पर शरदचंद्र पवार की बात पर उद्धव ठाकरे की बात पर मत देना काँग्रेस के हातपर', असे यमक जुळवून त्यांनी तुळजापूरमधील उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले. अमित देशमुख धीरज पाटील यांच्या सभेसाठी तुळजापुरात आले असताना जाहीर सभेतच त्यांनी गाणे आणि शायरी म्हणत भाजपवर जोरदार टीका केली. तुळजापुरातील या प्रचार सभेला महाविकास आघाडीतील सर्व नेतेमंडळी उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.