
Jalna News: काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी दोन दिवसापूर्वी जालन्याचे खासदार कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी लवकरच आपण मोठा भूकंप करणार असल्याचा दावा केला होता. शिवसेनेचे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांनी मात्र गोरंट्याल यांच्या भूकंपाचा दावा फुसका असल्याचे सांगत खिल्ली उडवली. डरकाळी फोडणारे वाघ कधी अंगावर येत नसतात, असा चिमटाही खोतकर यांनी काढला.
विधानसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल कमालीचे नाराज आहेत. पक्षातील लोकांनीच आपला घात केल्याचा आरोप करत मतदार संघात जास्त काम करणाऱ्याला जनता 'जा ना'असे म्हणते, अशा शब्दात गोरंट्याल यांनी उद्विग्नता व्यक्त केली होती. एवढेच नाही तर खासदार कल्याण काळे यांनाही सावधानतेचा इशारा देत लवकरच आपण जालनाच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणार असल्याचे म्हटले होते.
शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांना या भूकंपाविषयी माध्यमांनी छेडले असता स्मित हास्य करत खोतकर यांनी भूकंप वगैरे काही नाही ते सगळे फुसका बार आहे. या विषयावर मी सविस्तर पत्रकार परिषद घेऊनच बोलेन. डरकाळी फोडणारे वाघ कधी अंगावर येत नसतात, असा टोलाही खोतकर यांनी यावेळी लगावला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी कैलास गोंरट्याल यांचा 30 हजाराहून अधिक मतांच्या फरकाने पराभव केला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली होती. दोघांनीही एकमेकांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत ते बाद करण्याची मागणी केली होती. यावर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बराच वेळ घेत रात्री उशिरा दोघांचेही अर्ज कायम ठेवत या वादावर पडदा टाकला होता. त्यामुळे विधानसभेच्या जालना मतदारसंघात खोतकर विरुद्ध गोरंट्याल अशी पारंपारिक लढत झाली. त्यात खोतकरांनी बाजी मारली.
हा पराभव गोरंट्याल यांच्या जिव्हारी लागला आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत आपल्याला दगा दिला, असा त्यांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर ते काँग्रेस सोडून जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात सुरू आहेत. त्यातच जाहीर कार्यक्रमात गोरंट्याल यांनी राजकीय भूकंप घडवण्याची भाषा केल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली.
तसेच गोरंट्याल यांनी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवडीला आव्हान देत त्यांनी निवडणूक अर्जात लाभाचे पद आणि त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप करत खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात खोतकर विरुद्ध गोरंट्याल असा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
अर्जुन खोतकर यांनी गोरंट्याल यांच्या भूकंप घडवण्याच्या दाव्यावर आपण पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलणार असल्याचे सांगितल्यामुळे ते नेमका काय गौप्यस्फोट करतात? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.