

Asduddin Owaisi: एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर काल झालेल्या हल्यानंतर ओवेसींच्या सभेने काही प्रमाणात चित्र बदलले आहे. तिकीट विकल्याचा आरोप करत इम्तियाज यांच्याविरोधात जाऊन त्यांचे फोटो पायदळी तुडवणारे पक्षाचे गटनेते नासीर सिद्दीकी, माजी जिल्हाध्यक्ष शेख अहेमद हे ओवेसींच्या सभेत व्यासपीठावर दिसले. 26 पैकी 22 माजी नगरसेवकांचे तिकीट कापल्यामुळे एमआयएममध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष होता.
नासीर सिद्दीकी, जिल्हाध्यक्षांनी सर्वप्रथम या अंसतोषाला हवा देण्याचे काम केले होते. नासीर सिद्दीकी यांनी इम्तियाज जलील यांच्या फोटो पायदळी तुडवत त्यांनी दलालांना तिकीटं विकल्याचा आरोप केला होता. "बाप बेटे ने बैठकर तिकीट फायनल किये, और मोहर ओवेसीसाहब की उठायी" असे म्हणत दंड थोपटले होते. इम्तियाज जलील यांच्या कायम मांडीला मांडी लावून बसणारे हे दोन महत्वाचे पदाधिकारी दुरावल्यामुळे पक्षांतर्गत असंतोषाचा भडका उडाला.
प्रत्यक्षात प्रचार, पदयात्रांना सुरूवात झाली तेव्हा ठिकठिकाणी इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवले गेले. काही ठिकाणी धक्काबुक्की झाली तर काल जिन्सी भागात त्यांच्या गाडीवर हल्ला करून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. दुपारी हा प्रकार घडला आणि रात्री शहराच्या आमखास मैदानावर असदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा झाली. या सभेत अचनाक व्यासपीठावर नासीर सिद्दीकी आणि माजी जिल्हाध्यक्ष शेख अहमद यांची एन्ट्री झाली.
नासीर सिद्दीक यांनी भाषणही केले, सभेच्या शेवटी ओवेसी यांनी या दोघांना सोबत घेत हातात घेत गर्दीला आवाहनही केले. इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला आणि ओवेसींची रात्रीची सभा या दरम्यान, एमआयएममध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या. ओवेसी थांबलेल्या हॉटेलमध्ये पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी जे तिकीट वाटपामुळे नाराज होऊन बाजूला झाले होते, त्यांना भेटण्यासाठी बोलावण्यात आले होते. ओवेसी यांनी नासीर सिद्दीकी, शेख अहमद यांच्यासह अनेकांशी वैयक्तिक चर्चा करत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
यावर निवडणुकीत पक्षाला नुकसान होईल, असे वागू नका. यामुळे विरोधकांचा फायदा होईल. त्यापेक्षा पक्षासोबत राहा, काम करा, तुमची नाराजी निश्चित दूर केली जाईल, असा शब्द ओवेसी यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतरच नासीर सिद्दीकी आणि शेख अहमद हे ओवेसींच्या सभेत व्यासपीठावर दिसले. एवढेच नाही तर आज ओवेसींच्या पदयात्रेत नासीर सिद्दीकी आणि इम्तियाज जलील हे एकमेकांच्या खांद्यावर हात आणि गळ्यात गळे घालून फिरताना दिसले.
आमच्यात मतभेद होते, इम्तियाज जलील यांनी म्हणणे ऐकले नाही, म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात म्हणजेच ओवेसींच्या दरबारात गेलो. त्यांनी पक्षासाठी काम करा, ताकद वाढवा असे आवाहन करत आमची नाराजी दूर केली आहे. आता प्रचार करतोय, इम्तियाज यांच्यासोबत आहे, असे नासीर सिद्दीकी यांनी सांगितले. तर इम्तियाज यांनीही नासीर सिद्दीकी यांनी माझ्या पेक्षा जास्त काम पक्ष वाढवण्यासाठी केले आहे. घरात दोन भाऊ असले तर त्यांच्यात देखील मतभेद असतात. आमचा तर राजकीय पक्ष आहे. पण आता नाराजी नाही, नासीरभाई आमच्यासोबत आहेत, असे सांगत 16 जानेवारीला आम्ही सर्वात मोठा उत्सव साजरा करू, असा दावा केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.