Nanded BJP : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे खासदार अशोक चव्हाण मागे पडले होते. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला नांदेड जिल्ह्यात शतप्रतिशत यश मिळाले. अशोक चव्हाण यांनी कन्या श्रीजया यांनाही भोकर मतदारंसघातून निवडून आणले आणि नांदेडमध्ये पुन्हा अशोक चव्हाण हळूहळू पकड मिळवू लागले आहेत.
आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी नुकताच स्वबळाचा नारा दिला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पक्ष संघटनेतील महत्वाची पदं ही आपल्या विश्वासू माणसालाच मिळाली पाहिजे, असाही प्रयत्न अशोक चव्हाण यांनी सुरू केला आहे. नांदेड भाजप महानगर कार्याध्यक्ष पदी चव्हाण यांची सावली म्हणून वावरणारे माजी आमदार अमर राजूकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून अशोक चव्हाणांचे विश्वासू सहकारी म्हणून राजूकर ओळखले जातात. चव्हाण यांचा शब्द त्यांच्यासाठी अंतिम असतो. (Nanded) लोकसभा निवडणुकीपुर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्यासोबत अमर राजूरकर यांनीही काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. अद्याप त्यांचे राजकीय पुनर्वसन झाले नसले तरी अशोक चव्हाण यांनी त्यांना पक्ष संघटनेचे महत्वाचे पद आणि जबाबदारी या निमित्ताने सोपवली आहे.
अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक असलेले प्रताप पाटील चिखलीकर भाजप सोडून विधानसभेच्या उमेदवारीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. लोहा-कंधारमधून ते निवडूनही आले,आता ते भाजपमध्ये नसल्याने जिल्ह्याची सगळी सुत्रं अशोक चव्हाण यांच्या हाती गेली आहेत. भाजपचे अनेक आमदार अजूनही अशोक चव्हाण यांच्यापासून अंतर राखून आहेत.
पण पक्षाने मात्र जिल्ह्याचे नेतृत्व अशोक चव्हाण यांच्याकडेच राहील हे स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला विशेषतः भाजपला मिळालेले यश, कन्या श्रीजया यांचा झालेला विजय यामुळे अशोक चव्हाण यांचा काॅन्फीडंस कमालीचा वाढला आहे. नांदेडवरील ढीली झालेली पकड पुन्हा मजबुत करण्यासाठी अशोक चव्हाण यांनी राज्य पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत.
काँग्रेसमधून अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये आलेल्या आणखी काही समर्थकांवर संघटनेची महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. एकूणच नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचाच आवाज चालणार, असे दिसते. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे नांदेड महानगर कार्याध्यक्ष म्हणून माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल अशोक चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.